
अमरावती, 16 मे (हिं.स.)। अल्पवयीन मुलीचे दीड वर्षांमध्ये दोघांसोबत लग्न लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात उजेडात आली. दोघांनी तिला हाकलून दिल्यामुळे पीडितेवर बेघर होण्याची वेळ आली. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न २०२४ मध्ये दर्यापूर तालुक्यातील एका ३१ वर्षीय व्यक्तीसोबत काही नातेवाइकांनीच गळ्यात हार टाकून लावून दिले होते. ज्याच्यासोबत लग्न लावले त्या व्यक्तीचे पीडित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यांनतर काही दिवसांनी पिडीता कौटुंबिक वादामुळे नातेवाइकांकडे परत निघून गेली होती. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी २०२६ मध्ये अल्पवयीन मुलीचे दुसरे लग्न काही जणांनी मध्यस्थी करून अकोला जिल्ह्यातील अन्य युवकासोबत पीडितेच्या मनाविरुद्ध लावून दिले होते. लग्न लावताना दुसऱ्या पतीचे आईवडील व काही नातेवाईक हजर होते. दुसऱ्या पतीनेही पीडित अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. मात्र, त्याच्याकडून सुद्धा त्रास देणे सुरू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी पहिले लग्न ज्या व्यक्तीसोबत झाले त्याच्याघरी परत गेली. परंतु त्याने हाकलून दिले.
दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तर, ज्या व्यक्तींनी, नातेवाइकांनी अल्पवयीन मुलीचे दोनवेळा लग्न लावून दिले त्या दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये दर्यापुर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. यासंदर्भात दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी सांगितले की, पिडीतेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पिडीतेचा पहिला पती आणि सासरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी