मध्य प्रदेश हायकोर्टाकडून धार भोजशाळा मंदिर घोषित
- मुस्लिम पक्षाला मशिदीसाठी स्वतंत्र जमीन देण्याचाही निर्णय इंदोर, 15 मे (हिं.स.) - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार भोजशाळेला मंदिर म्हणून घोषित करून हिंदू पक्षाची मागणी मान्य करण्यात आली आहे. देवी वागदेवी सरस्वतीचं मंदिर त्या ठ
मध्य प्रदेश हाय कोर्ट


- मुस्लिम पक्षाला मशिदीसाठी स्वतंत्र जमीन देण्याचाही निर्णय

इंदोर, 15 मे (हिं.स.) - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार भोजशाळेला मंदिर म्हणून घोषित करून हिंदू पक्षाची मागणी मान्य करण्यात आली आहे. देवी वागदेवी सरस्वतीचं मंदिर त्या ठिकाणी असल्याच्या दाव्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं असून तिथे हिंदू समुदायाला पूजेची परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला मशिदीसाठी स्वतंत्र जमीन देण्याचाही निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने सरकारला मशिदीसाठी स्वतंत्र जमीन देण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) भोजशाळेचे संरक्षण करत राहील, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेशमधील वादग्रस्त भोजशाला-कमाल मौला मशीद परिसर चर्चेचा विषय ठरला होता. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देशभरातील काही ठिकाणांचीही अशाच प्रकारे चर्चा वाढू लागली होती. त्यातच मध्य प्रदेशच्या धार भोजशाला-कमाल मौला मशीद परिसराचाही समावेश होता. या ठिकाणी आधी मंदिर होतं, असा दावा करण्यात आला. या संदर्भात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सविस्तर खटला देखील चालला. अखेर आज त्या संदर्भात न्यायालयानं मोठा निकाल दिला असून तिथे मंदिरच होतं, असा निर्वाळा दिला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आपल्या निकालपत्रात न्यायालयाने या ठिकाणाबाबत सविस्तर टिप्पणी केली आहे. “ऐतिहासिक दस्तावेज आणि स्थापत्यशास्त्राचे संदर्भ पाहाता हे सिद्ध झालं आहे की, वादग्रस्त परिसर हा परमार वंशाचे राजे भोज यांच्याशी संबंधित असून संस्कृत प्रशिक्षणाचं एक केंद्र होतं. त्या काळातील लेखी व स्थापत्यशैलीचे संदर्भ हे स्पष्ट करतात की, त्या काळी धारमधील या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर होते, असं न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, यावेळी न्यायालयाने हिंदू फ्रंट फॉर जस्टिसतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका मान्य करत ७ एप्रिल २००३ रोजी पुरातत्व खात्याच्या संचालकांनी दिलेले आदेश रद्द केले. या आदेशांनुसार, वादग्रस्त ठिकाणी हिंदू समुदायाला पूजेची परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच, मुस्लीम समुदायाला तिथे नमाज पठणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे आदेशच रद्द ठरवत भोजशाला परिसरात हिंदू समुदायाला पूजेची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, हिंदू समुदायाला या ठिकाणी पूजेची परवानगी देण्यात आली असली, तरी धार भोजशाला वास्तूचं नियंत्रण न्यायालयाने पुरातत्त्व खात्याकडेच ठेवलं आहे. भोजशाला आणि तेथील संस्कृत प्रशिक्षण केंद्रासंदर्भातलं व्यवस्थापन करण्याबाबत न्यायालयाने यावेळी केंद्र सरकार व केंद्रीय पुरातत्व विभागाला आदेश दिले. “या वास्तूचं जतन, संवर्धन व व्यवस्थापनाची पूर्णपणे जबाबदारी पुरातत्व खात्याकडे असेल”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

भोजशाळा वाद काय आहे?

मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा संकुलावरून हिंदू आणि मुस्लिम पक्षांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे प्राचीन मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचे केंद्र मानतो, तर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणत आला आहे. अनेक वर्षांपासून येथे पूजा आणि प्रार्थनेसाठी विशेष व्यवस्था होती. हिंदूंना मंगळवारी पूजा करण्याची परवानगी होती, तर मुस्लिम समुदाय शुक्रवारी प्रार्थना करत असे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande