मृतांच्या नावावर धान्य उचलून लाखोंचा घोटाळा; दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा
जळगाव, 15 मे, (हिं.स.) - अमळनेर तालुक्यातील दहिवद परिसरात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, मृत लाभार्थ्यांच्या नावावर गहू व तांदूळ उचलून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन रेशन दुकानदारांविरोधात अखेर न्याया
मृतांच्या नावावर धान्य उचलून लाखोंचा घोटाळा; दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा


जळगाव, 15 मे, (हिं.स.) - अमळनेर तालुक्यातील दहिवद परिसरात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, मृत लाभार्थ्यांच्या नावावर गहू व तांदूळ उचलून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन रेशन दुकानदारांविरोधात अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुरवठा विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दहिवद येथील रेशन दुकान क्रमांक १४५ चे चालक रमेश पाटील यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत अंत्योदय व बीपीएल योजनेतील लाभार्थी सुमनबाई मच्छिंद्र पाटील, गुणवंताबाई आत्माराम माळी, सोनाबाई देवचंद माळी आदी मृत व्यक्तींच्या नावावर धान्य उचलल्याचा आरोप आहे. संबंधित लाभार्थी मृत असतानाही त्यांच्या नावावर नियमित धान्य वितरण दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली.तक्रारदार श्यामकांत जयंंतराव पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर अमळनेर पोलिसांत जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत दुकान क्रमांक १४५ मधून अंत्योदय योजनेचे सुमारे ५८ हजार ३३४ रुपये किमतीचे २२४० किलो गहू-तांदूळ, तर बीपीएल योजनेचे ३ लाख ६६ हजार ४१२ रुपये किमतीचे तब्बल ९६०० किलो धान्य अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दुकान क्रमांक १४६ चे चालक कोकीळाबाई वासुदेव माळी यांनीही मृत लाभार्थी तसेच पात्र नसलेल्या व्यक्तींच्या नावावर धान्य उचलल्याचे समोर आले आहे. काही लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य न देता त्यांच्या नावावर बनावट नोंदी करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात अंत्योदय व बीपीएल योजनेंतर्गत लाखो रुपयांचे गहू-तांदूळ अपहार झाल्याची नोंद आहे. या गंभीर गैरव्यवहारानंतर संबंधित दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोऱसे पुढील तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande