
नवी दिल्ली,15 मे (हिं.स.) : “काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात,” अशा शब्दांत सरन्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान ते म्हणाले की, काही तरुण माध्यमे, समाज माध्यमे आणि माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते बनून व्यवस्थेला लक्ष्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एका वकिलाने स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने संबंधित वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली. “समाजात आधीच अनेक परजीवी वावरत आहेत आणि ते सतत व्यवस्थेला लक्ष्य करत असतात. तुम्हालाही त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का ?” असा थेट सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला. “कदाचित संपूर्ण जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल, पण किमान तुम्ही तरी त्या पदासाठी पात्र नाही.” तसेच, “दिल्ली उच्च न्यायालयाने जरी तुम्हाला वरिष्ठ वकील म्हणून मान्यता दिली असती, तरी तुमचे व्यावसायिक वर्तन पाहता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असता,” असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलाच्या फेसबुक पोस्ट आणि सोशल मीडियावरील भाषेचाही उल्लेख केला. “त्यांच्या कायद्याच्या पदवीबाबत मला शंका आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर ते जे काही पोस्ट करतात त्याकडे आमचे लक्ष नाही, असे त्यांना वाटते. व्यावसायिक शिस्त काय असते हे मी तुम्हाला दाखवतो अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केलीआहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी