थायलंड ओपन २०२६: सात्विक-चिराग उपांत्य फेरीत; पी. व्ही. सिंधू बाहेर
बँकॉक, 15 मे (हिं.स.)। भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार कामगिरी करत शुक्रवार रोजी थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व
Sports Badminton ThailandOpen Satwik Chirag semifi


बँकॉक, 15 मे (हिं.स.)। भारताची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार कामगिरी करत शुक्रवार रोजी थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

पहिल्या मानांकित भारतीय जोडीने जपानच्या सहाव्या मानांकित ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा एकतर्फी लढतीत २१-१२, २१-१३ असा पराभव केला. वर्ष २०२६ मध्ये कोणत्याही बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेत भारतीय जोडीने गाठलेली ही पहिलीच उपांत्य फेरी आहे. हा सामना ४१ मिनिटे चालला.दोन्ही जोड्यांमधील हा पहिलाच सामना होता. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये सात्विक-चिराग यांनी सलग १० गुण मिळवत १०-० अशी आघाडी घेतली होती. जपानी जोडीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय खेळाडूंनी त्यांना फारशा संधी दिल्या नाहीत.दुसऱ्या गेममध्ये जपानी जोडीने चांगला खेळ दाखवला, पण सात्विक आणि चिराग यांनी आपली आघाडी कायम ठेवत सहज सामना आपल्या नावावर केला. आता उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा सामना मलेशियाच्या गोह स्जे फेई आणि नूर इज्जुद्दीन या तिसऱ्या मानांकित जोडीशी किंवा स्कॉटलंडच्या क्रिस्टोफर आणि मॅथ्यू ग्रिम्ले यांच्याशी होणार आहे.

दरम्यान, महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूची मोहीम उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आली. जपानची अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली अकाने यामागुची हिने सिंधूचा १९-२१, २१-१८, २१-१५ असा पराभव करत स्पर्धेतून बाहेर काढले.पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. स्कोअर १९-१९ असा बरोबरीत असताना सिंधूने सलग दोन गुण मिळवत पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने मिड-गेम ब्रेकपर्यंत चार गुणांची आघाडी राखली होती, मात्र त्यानंतर झालेल्या सलग चुकांचा फायदा घेत यामागुचीने सलग सात गुण मिळवत सामन्यात पुनरागमन केले. निर्णायक गेममध्ये जपानी खेळाडूने सुरुवातीपासून आघाडी राखली आणि ६१ मिनिटे चाललेल्या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.आता भारतीय चाहत्यांचे लक्ष लक्ष्य सेन यांच्याकडे लागले आहे, जे उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विजेते आणि यजमान खेळाडू कुनलावुत वितिदसर्न यांच्याशी भिडणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande