
धर्मशाला, १५ मे, (हिं.स) मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने स्पष्ट केले की, तो दुखापतीमुळे मागील तीन सामने खेळू शकला नाही. शार्दुलने आशा व्यक्त केली आहे की, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी हार्दिक संघात परतण्याची शक्यता आहे.
धर्मशाला येथे गुरुवारी पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या संघासोबत प्रवास करू शकला नाही. त्या सामन्यात जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. यापूर्वी, सूर्यकुमार यादवदेखील मुलाच्या जन्मामुळे संघाबाहेर होता.
गुरुवारी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूर म्हणाला, हार्दिक दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो मागील काही सामन्यांसाठी संघासोबत प्रवास करू शकला नाही. शार्दुल पुढे म्हणाला, तो रायपूरला गेला होता पण खेळू शकला नाही. तो सध्या मुंबईत सराव करत आहे आणि मला आशा आहे की तो कोलकाताला परत येईल आणि २० मे रोजी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात खेळेल. अशा खेळाडूंची नेहमीच उणीव भासते. तो पुढे म्हणाला, सोशल मीडियावर अनेक गोष्टी पसरतात, काही खऱ्या तर काही खोट्या. पण धर्मशाला ला न जाण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता.
पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक ४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्यानंतर तो संघासोबत रायपूरला गेला, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध मैदानात उतरू शकला नाही. कर्णधार आणि खेळाडू या दोन्ही नात्याने हार्दिक पांड्यासाठी हा हंगाम निराशाजनक ठरला आहे. त्याने आठ डावांमध्ये २०.८५ च्या सरासरीने आणि १३६.४४ च्या स्ट्राइक रेटने १४६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ४० आहे. त्याने २०.४ षटकांत केवळ चार बळी घेतले असून, त्याची सरासरी ६१.५० आणि इकॉनॉमी रेट ११.९० आहे.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडणारे पहिले दोन संघ ठरले आहेत. लीग टप्प्यातील तीन सामने बाकी आहेत. हार्दिकच्या खराब कामगिरीनंतर, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्ससारख्या फ्रँचायझींमध्ये त्याच्या जाण्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर तीव्र झाल्या होत्या. तथापि, शार्दुल ठाकूरने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर