आयपीएल २०२६ : लखनऊचा ७ गडी राखून विजय
लखनऊ, 16 मे (हिं.स.)आकाश सिंगच्या तीन बळी आणि मिचेल मार्शच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा सात गडी राखून पराभव केला. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने १८७ धावांचे लक्ष्य
चेन्नई सुपर किंग्सचा संघ


लखनऊ, 16 मे (हिं.स.)आकाश सिंगच्या तीन बळी आणि मिचेल मार्शच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा सात गडी राखून पराभव केला. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने १८७ धावांचे लक्ष्य तीन गडी गमावून आणि २० चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. मार्शने लखनऊसाठी ३८ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि सात षटकारांसह ९० धावा केल्या. तत्पूर्वी, कार्तिक शर्माच्या ७१ धावांच्या जोरावर चेन्नईने १८७ धावांवर पाच गडी गमावले होते. लखनऊसाठी आकाश सिंग सर्वात यशस्वी ठरला, त्याने २६ धावांत तीन बळी घेतले. या निकालामुळे चेन्नईच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

मार्श आणि जोश इंग्लिस (३६) यांनी लखनऊला लक्ष्याचा पाठलाग करताना स्फोटक सुरुवात करून दिली. त्या दोघांनी १३५ धावांची भागीदारी रचली. पहिल्या तीन षटकांमध्ये त्यांना लय पकडायला वेळ लागला. पण, अंशुल कंबोजच्या पाचव्या षटकात मार्शने सलग चार षटकार ठोकून सामन्याचे चित्र पूर्णपण पालटले. पॉवरप्लेमध्ये लखनऊने बिनबाद ८६ धावा केल्या होत्या. मार्शने २१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

चेन्नईला १२व्या षटकात पहिले यश मिळाले. मुकेश चौधरीने इंग्लिशला उर्विल पटेलकरवी झेलबाद केले. त्या फलंदाजाने तीन चौकार आणि एक षटकार मारला होता. पुढच्याच चेंडूवर मार्श धावबाद झाला आणि त्याचे शतक हुकले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अब्दुल समदने एक षटकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर स्पेन्सर जॉन्सनने त्याला त्रिफळाचीत केले. यामुळे लखनऊची धावसंख्या अचानक बिनबाद १३५ वरून तीन गडी बाद १४४ झाली. मुकुल चौधरीची विकेटही जवळपास गेली होती, पण गुर्जपनीत सिंगच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सॅमसन झेल घेऊ शकला नाही. त्याने आणि निकोलस पूरनने याचा फायदा उचलला आणि लखनऊला सामना जिंकून दिला.

प्रथम फलंदाजी करताना, चेन्नईची आघाडीची फळी आकाश सिंगसमोर कोसळली. संजू सॅमसन (२०), ऋतुराज गायकवाड (१३) आणि उर्विल पटेल (६) स्वस्तात बाद झाले. हे तिघेही सलग तीन षटकांत बाद झाल्याने, चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येच्या आशांना मोठा धक्का बसला. कार्तिक आणि देवाल्ड ब्रेविसने सीएसकेला सावरले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करून चेन्नईला १०० धावांच्या पुढे नेले. ब्रेविस १६ चेंडूंमध्ये दोन षटकारांसह २५ धावा केल्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

आयपीएलमध्ये प्रथमच खेळणाऱ्या कार्तिकने ३५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सहा चौकार आणि पाच षटकारांनी सजलेली खेळी खेळल्यानंतर तो शहबाज अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये, शिवम दुबेने १६ चेंडूंमध्ये ३२ धावा आणि प्रशांत वीरने १३ धावा करून संघाला १८७ धावांपर्यंत पोहोचवले. दुबेच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. याशिवाय आकाश, शमी आणि शहबाज यांनी लखनऊसाठी प्रत्येकी एक बळी घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande