
धार येथील भोजशाळा व माँ सरस्वती यांच्या स्थानासंबंधी न्यायालयाने शुक्रवारी दिलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने त्या सनातन चेतनेच्या वैश्विक स्वीकृतीचे प्रतीक आहे, जिने हजारो वर्षे ज्ञान, शिक्षण, कला आणि संस्कृतीला दिशा दिली आहे. जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा देश असलेल्या इंडोनेशियाने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे सरस्वती मातेची 16 फूट उंच भव्य मूर्ती स्थापित करणे हे या गोष्टीचे द्योतक आहे की ज्ञानदेवी कोणत्याही धर्म, जात किंवा देशाच्या सीमांमध्ये बंदिस्त नाही. कमळावर विराजमान वीणावादिनी सरस्वती आज व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर उभी राहून संपूर्ण जगाला सांगत आहे की सभ्यतेची खरी शक्ती शस्त्रांमध्ये नव्हे, तर शिक्षण आणि संस्कृतीमध्ये आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेचा वैश्विक विस्तार
वस्तुतः मध्यप्रदेशातील धार येथे स्थित भोजशाळेबाबत आलेला न्यायिक निर्णय पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक व सांस्कृतिक सत्याला समोर आणतो, ज्याला वर्षानुवर्षे वाद आणि राजकारणाच्या छायेत दडपण्याचा प्रयत्न झाला. हा केवळ एका इमारतीचा प्रश्न नाही, तर भारताच्या ज्ञानपरंपरेचा, माँ वाग्देवीच्या उपासनेचा आणि सांस्कृतिक स्मृतीचा विषय आहे, जो भारतभूमीतून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
सनातन परंपरेत सरस्वती माता ही केवळ देवी नाही, तर ज्ञानाची चेतना आहे. हातातील वीणा कला-शक्तीचे प्रतीक आहे, पुस्तक ज्ञानाचे, माला साधनेचे आणि श्वेत कमळ पवित्रतेचे संदेश देतो. भारतीय संस्कृतीने फार पूर्वीच मान्य केले होते की शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून मनुष्याला संस्कारित करण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच सरस्वतीची उपासना बालशिक्षणापासून ते महाविद्वानांच्या साधनेपर्यंत अविभाज्य घटक राहिली आहे.
मुस्लिम बहुल देशाकडून सरस्वतीचे महत्त्व समजून घेणे
इंडोनेशियाची सुमारे 88 टक्के लोकसंख्या मुस्लिम असून हिंदूंचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीदेखील तेथील सरकारने अमेरिकेला माँ सरस्वतीची मूर्ती भेट देऊन हे स्पष्ट केले की ज्ञान आणि शिक्षण कोणत्याही धर्म, पंथ किंवा मजहबाची मक्तेदारी नाही. इंडोनेशियन दूतावासानेही नमूद केले आहे की ही स्थापना धार्मिक प्रतीकापेक्षा अधिक म्हणजे शिक्षण, सांस्कृतिक संवाद आणि मानवी संबंध दृढ करण्याचे माध्यम आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांनी मूर्तीच्या अनावरणावेळी म्हटले की ही प्रतिमा लोकांचे मन आणि बुद्धी खुली करेल तसेच द्वेष आणि गैरसमज दूर करेल. हा संदेश आज संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संघर्ष, कट्टरता आणि सांस्कृतिक तणावाच्या काळात सरस्वतीचा संदेश ज्ञान, संवाद आणि सहअस्तित्वाचा आहे. म्हणूनच वॉशिंग्टनसारख्या ठिकाणीही ही मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भोजशाळा : केवळ इमारत नव्हे, ज्ञानतीर्थ
धार येथील भोजशाळेबाबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि स्थानिक परंपरा यांचा मोठा वर्ग यास राजा भोज यांनी स्थापन केलेले वाग्देवीचे मंदिर आणि संस्कृत शिक्षण केंद्र मानतो. परमार वंशाचे महान राजा भोज हे केवळ शासक नव्हे तर विद्वान, साहित्यिक आणि शिक्षणाचे संरक्षक होते. त्यांची राजधानी धार ही दीर्घकाळ भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र राहिली.भोजशाळेत सरस्वतीची उपासना होत असे आणि येथे विद्वानांच्या सभा भरत असत. त्यामुळेच यास “विद्येची तपोभूमी” असे मानले गेले. येथे सापडलेले शिलालेख, स्थापत्यशैली, स्तंभांची नक्षीकामे आणि संस्कृत लेख हे या ठिकाणाचे भारतीय ज्ञानपरंपरेशी असलेले गाढ नाते स्पष्ट करतात.
न्यायालयीन निर्णय आणि पुरावेन्यायालयीन निर्णयासोबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अहवालांनी अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक तथ्य पुन्हा जगासमोर आणले आहेत. सर्वेक्षणात मंदिर स्थापत्यशैली, देवतांशी संबंधित चिन्हे, कमळाकृती, संस्कृत शिलालेख आणि हिंदू प्रतीकांचे पुरावे आढळले आहेत. या सर्व पुराव्यांमुळे हे स्पष्ट होते की ही संरचना मूळतः हिंदू स्थापत्यावर आधारित होती आणि वाग्देवीच्या उपासनेशी संबंधित होती.
शिक्षण हीच राष्ट्राची खरी शक्ती
कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद त्याच्या शस्त्रांमध्ये किंवा आर्थिक आकड्यांमध्ये नसून त्याच्या शिक्षण आणि सांस्कृतिक चेतनेमध्ये असते. भारताने तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला यांसारख्या महान विद्यापीठांची परंपरा जगाला दिली आहे. भोजशाळा ही त्याच गौरवशाली परंपरेची एक महत्त्वाची कडी आहे.
सरस्वती मातेचा संदेश असा आहे की ज्ञान माणसाला विनम्र बनवते आणि विनम्रता समाजाला जोडते. वॉशिंग्टनमधील सरस्वतीची मूर्ती आणि धार येथील भोजशाळेभोवतीचा निर्णय हे दोन्ही मिळून एकच संदेश देतात ज्या सभ्यतेने आपली ज्ञानपरंपरा जपली, तीच भविष्यात जगाला दिशा देऊ शकते. इंडोनेशिया आज मुस्लिम बहुल देश असूनही आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेला आहे. भारतानेही आपल्या ज्ञानपरंपरेकडे आत्मविश्वासाने पाहण्याची गरज आहे. भोजशाळा हे त्याचे जिवंत प्रतीक ठरू शकते.
— डॉ. मयंक चतुर्वेदी
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी