भारताचे संरक्षण, सर्वांगीण अभिवृद्धी आणि लोककल्याणार्थ श्री राजमातंगी महायज्ञ
यज्ञ हे सनातन सनातन संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. विश्वकल्याणासाठी यज्ञयाग करण्याची आपली परंपरा आहे. सध्
श्री राजमातंगी महायज्ञ


यज्ञ हे सनातन सनातन संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. विश्वकल्याणासाठी यज्ञयाग करण्याची आपली परंपरा आहे. सध्या तिसऱ्या महायुद्धाचे सावट संपूर्ण जगावर आहे. जरी राजकीय, बौद्धिक स्तरावर प्रयत्न होत असले, तरी आध्यात्मिक पाठबळ हे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच मुंबई येथे श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन सनातन संस्थेच्या वतीने केले आहे, या निमित्ताने लेखप्रपंच !

यज्ञ संस्कृती: भारतीय संस्कृतीत यज्ञाला 'ब्रह्मांडाची नाभी' मानले जाते. म्हणजेच यज्ञ हा सृष्टीचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळेच वैदिक काळापासून यज्ञांना विशेष महत्व दिले आहे. एकूणच या यज्ञांच्या माध्यमातून देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून इच्छित ध्येय साध्य करणे सुलभ होते. राजसूय, अश्‍वमेध, पुत्रकामेष्टी आदी यज्ञांविषयी सविस्तर माहिती हिंदू धर्मग्रंथांत आढळते. यज्ञातील अग्नी आणि मंत्रांच्या उच्चाराने वातावरणातील नकारात्मकता दूर केली जाते. यज्ञाच्या माध्यमातून वातावरणाचे संतुलन राखले जाते आणि त्याची शुद्धी होत असते. यज्ञाचा पर्यावरणावर, तसेच मानवजातीवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, हे आता वैज्ञानिक संशोधनातूनही समोर आले आहे.

सनातनच्या आश्रमात आतापर्यंत रामराज्याच्या स्थापनेसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी ३०० हून अधिक यज्ञ आणि १,००० हून अधिक धार्मिक विधी केले आहेत. यामध्ये साग्निचित् अश्वमेध महासोमयाग, उच्छिष्ट गणपति यज्ञ, चंडीयाग, धन्वंतरि याग, संजीवनी होम, पंचमहाभूत याग आदी यागांचा समावेश आहे. या यज्ञयागांचा संकल्प धर्मकार्यात येणारे अडथळ्यांचे निवारण व्हावे तसेच रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, असा समष्टीच्या कल्याणाचा होता. मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी शतचंडी यज्ञ आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ आयोजित करण्यात आला. या वेळी देशविदेशातील संत-महंत यांच्यासह ३० हजारांहून अधिक भाविक आणि हिंदू धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

श्री राजमातंगी देवीचे कार्य आणि महायज्ञाचे प्रयोजन ! : आदिशक्ति देवी सतीच्या क्रोधातून निर्माण झालेली शक्तीची दहा रूपे म्हणजे 'दशमहाविद्या'! काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या आहेत. मातंगी आदिशक्तिची प्रधानमंत्री (सल्लागार) असल्याने तिला 'श्री राजमातंगी' असे म्हटले जाते. या देवीच्या उपासनेने शत्रूवर नियंत्रण प्राप्त होत असल्याने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी श्री राजमातंगीदेवीचे संरक्षककवच आवश्यक आहे. श्रीविष्णूच्या विविध दशावतारांच्या वेळीही दशमहाविद्या कार्यरत असतात. त्रेतायुगात श्रीरामाच्या अवताराच्या वेळी श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते; म्हणून आदर्श रामराज्य स्थापन झाले ! सद्यस्थितीतही रामराज्याच्या निर्मितीसाठी श्रीराजमातंगी देवीची कृपा आवश्यक आहे !

राजमातंगी ही 'विजयप्रदा आहे. सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी; म्हणून सनातन संस्थेने 'श्री राजमातंगी महायज्ञ' आयोजित केला आहे. या वेळी श्री राजमातंगीदेवीची स्तुती करून भारताचा सर्वांगीण विकास आणि रक्षण यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येईल ! सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी धर्मकार्याचा आरंभ केला, त्या मुंबादेवीच्या नगरीत आयोजित हा महायज्ञ म्हणजे 'रामराज्य निर्मिती'च्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊलच ! या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ आपण सपरिवार उपस्थित राहून अवश्य घ्यावा, ही विनंती !

स्थळ : नर्दुल्ला टँक मैदान, श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागे, प्रभादेवी, मुंबई.

दिनांक : रविवार, १७ मे २०२६, वेळ : दु. ३.३० ते सायं.७.३० वा.

संपर्क क्र.: ७२०८१३०८३०

संकलक : श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande