...तर मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत लोटली जाईल - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली / ॲमस्टरडॅम, १७ मे (हिं.स.) : जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्ध सुरू झाले, आता ऊर्जा संकट आहे. एकूणच सततची युद्धे आणि जागतिक अस्थिरतेमुळे गेल्या काही दशकांपासून सुरू झालेल्या विकास प्रक्रियेची पीछेहाट होण्य
PM Modi nederlands


नवी दिल्ली / ॲमस्टरडॅम, १७ मे (हिं.स.) : जग अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्ध सुरू झाले, आता ऊर्जा संकट आहे. एकूणच सततची युद्धे आणि जागतिक अस्थिरतेमुळे गेल्या काही दशकांपासून सुरू झालेल्या विकास प्रक्रियेची पीछेहाट होण्याचा धोका आहे. यामुळे मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत लोटली जाऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तसेच या आव्हानांचा सामना करण्यासाठी लवचिक आणि विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

नेदरलँडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले, सध्या जग अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. कोरोना साथरोगाचे परिणाम, सुरू असलेली युद्धे आणि ऊर्जा संकट यामुळे हे दशक जगासाठी संकटांचे दशक ठरत आहे. ही परिस्थिती लवकर न बदलल्यास गेल्या दशकांतील प्रगतीची फळे नष्ट होतील आणि जगातील मोठा वर्ग पुन्हा गरिबीच्या जाळ्यात अडकेल, अशी भीती आहे.

नेदरलँडमधील भारतीयांनी आपले सांस्कृतिक मूळ जपतानाच तिथल्या समाजात मोलाचे योगदान दिले आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचा प्रवास हा संघर्षातून प्रगतीकडे नेणारा असून, त्यांनी भारतीय भाषा आणि परंपरा अनेक पिढ्या जपल्या आहेत.

पंतप्रधानांनी गेल्या दशकातील भारताच्या राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचाही आढावा देताना सांगितले की, १६ मे २०१४ रोजी भारतात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार सत्तेवर आले. गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रांत भारत झपाट्याने प्रगती करीत आहे. भारताला ऑलिंपिकचे आयोजन करायचे आहे, जागतिक उत्पादन आणि हरित ऊर्जा केंद्र बनायचे आहे. जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करायचे आहे.

आज जगाला परिस्थितीनुसार बदलणारी लवचिक पुरवठा साखळी हवी आहे. अशा वेळी भारत आणि नेदरलँड मिळून एक विश्वसनीय पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऊर्जेपासून पाण्याच्या सुरक्षेसाठी तसेच हरित हायड्रोजनसाठी दोन्ही देश काम करत आहेत. युरोपियन महासंघासोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी मजबूत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande