आखाती देशांच्या विनंतीवरून ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला रोखला
-अमेरिकेने इराणवर एका मोठ्या लष्करी हल्ल्याची योजना आखली होती, जी ऐनवेळी थांबवली – ट्रम्प- कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांकडून हल्ला टाळण्याचे आवाहन-इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सध्या वाटाघाटी सु
डोनाल्ड ट्रम्प


-अमेरिकेने इराणवर एका मोठ्या लष्करी हल्ल्याची योजना आखली होती, जी ऐनवेळी थांबवली – ट्रम्प- कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांकडून हल्ला टाळण्याचे आवाहन-इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी सध्या वाटाघाटी सुरू

नवी दिल्ली, 19 मे (हिं.स.)जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि पाकिस्तान हे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहेत. मध्यस्थ म्हणून अपयशी ठरूनही, पाकिस्तानने हार मानलेली नाही आणि तो स्वतःहून इराणला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. कतार, सौदी अरेबिया आणि UAE हे संकट सोडवण्यासाठी संयुक्तपणे राजनैतिक प्रयत्न करत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणवरील नियोजित हल्ला पुढे ढकलण्यासाठी राजी केले आहे.

अरब वाहिनी अल जझीरा, अमेरिकन वाहिनी सीबीएस न्यूज आणि पाकिस्तानी वाहिनी दुनिया न्यूजच्या वृत्तांनी इराण-अमेरिका संघर्षावर विस्तृतपणे प्रकाश टाकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, कतार, सौदी अरेबिया आणि UAE यांच्या विनंतीवरून त्यांनी इराणवरील नियोजित हल्ला पुढे ढकलला आहे. ते म्हणाले, शांतता कराराबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, सौदी अरेबिया, कतार आणि UAE लवकरच शांतता करार घडवून आणण्यासाठी एका करारावर पोहोचतील.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा आपल्या मुख्य अटीवर जोर दिला. त्यांनी सांगितले की इराणने आपला अणुकार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत सोडून दिला पाहिजे. त्यांनी आपली भूमिका नरम करत असेही म्हटले की, जर त्यांचे पश्चिम आशियाई मित्र देश समाधानी असतील तर अमेरिकेला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे अमेरिका मंगळवारी इराणवर हल्ला करणार नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या मते, हा करार अमेरिका आणि मध्य पूर्वेकडील देश या दोघांनाही मान्य असेल.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी, इराणने म्हटले होते की त्यांनी संभाव्य शांतता कराराच्या अटींचा आणखी एक सुधारित मसुदा पाठवला आहे. असे वृत्त आहे की हा मसुदा पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आला होता. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले, हे लक्षात घेतले पाहिजे की संवाद म्हणजे शरणागती नव्हे. राष्ट्राची प्रतिष्ठा, हक्क आणि अधिकारांचे रक्षण करत या चर्चेत सहभागी होण्यास तेहरानने सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी तेहरानमध्ये दाखल झाले असून इराण आणि अमेरिका यांच्यातील रखडलेली शांतता चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. १६ मे पासून तेहरानमध्ये असलेल्या नक्वी यांनी काल वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेतल्या. त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष, इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि गृहमंत्री एस्कंदर मोमेनी यांची भेट घेतली. इराणी राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, इस्लामिक देशांमधील समन्वय आणि एकता हे चिरस्थायी शांतता आणि स्थिरतेचा पाया ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande