
नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.)नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला सीबीआयने राऊस ॲव्हेन्यू न्यायालयासमोर हजर केले, जिथे न्यायालयाने वनस्पतीशास्त्र शिक्षिका मनीषा मांढरे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील जीवशास्त्र विषयाच्या लेक्चरर मनीषा गुरुनाथ मांढरे यांना दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात चौकशीनंतर अटक करण्यात आली. एजन्सीचा दावा आहे की, मांढरे या एनटीएच्या (एनटीए) पेपर-सेटिंग समितीचा भाग होत्या.
परीक्षेत कोणते प्रश्न येणार आहेत हे मांढरे यांना माहीत होते. परीक्षेपूर्वी त्यांनी पुण्यात एक विशेष कोचिंग क्लास चालवला होता, जिथे त्या विद्यार्थ्यांकडून वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयाचे प्रश्न लिहून घेत असत. तपासात असेही उघड झाले आहे की, माढरे यांनी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारे यांच्यामार्फत आपल्या कोचिंग क्लासमध्ये नीट विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले होते. आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून ९ आरोपींना अटक केली आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना फुटलेले पेपर पुरवण्याच्या बदल्यात लाखो रुपये घेतले. वाघमारेने नंतर ते पेपर इतर ओळखीच्या लोकांना वाटले. मनीषा वाघमारेला १४ मे रोजी अटक करण्यात आली होती.
मनीषा मांढरेची अटक ही मनीषा वाघमारे आणि पेपरफुटीचा सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीच्या आधारावर झाली. कुलकर्णी हा लातूर येथील रसायनशास्त्राचा प्राध्यापक असून तो अनेक वर्षे नीट (NEET) पेपर तयार करणाऱ्या समितीचा सदस्य होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कुलकर्णीने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या घरी एक विशेष वर्ग घेतला होता, ज्यात त्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न, पर्याय आणि उत्तरे शिकवली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे