
मुंबई, 19 मे (हिं.स.)। सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सर्व पुरवठा यंत्रणेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सारख्या पेट्रोलियम उत्पादनांची उपलब्धता सामान्य आणि अखंडित राखल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक मिहिर गणेश जोशी यांनी दिली आहे. राज्यातील पेट्रोलियम पदार्थांचा एकूण पुरवठा सामान्य आणि पुरेसा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील या तिन्ही तेल विपणन कंपन्यांनी अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील किरकोळ विक्री केंद्रांवर डिझेल आणि पेट्रोलच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. कंपन्यांनी या वाढलेल्या मागणीची पूर्तताही केली आहे. मे 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात, डिझेलच्या विक्रीत 19.66% आणि पेट्रोलच्या विक्रीत 20.39% वाढ नोंदवली गेली. या बरोबरच 18 मे 2026 रोजी, डिझेलच्या विक्रीत 49% तर पेट्रोलच्या विक्रीत 34% वाढ नोंदवली गेली. तेल साठवणूक केंद्रे आणि डेपोपासून ते किरकोळ विक्री केंद्रांपर्यंतची इंधनाची संपूर्ण पुरवठा साखळी पूर्ण कार्यक्षमतेने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कार्यरत आहे. इंधनाच्या साठ्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात असून, महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी साठ्याची पुर्नभरणी प्रक्रियाही सुरळीतपणे सुरू आहे.
घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठा करण्याला प्राधान्य दिले जात असून संपूर्ण राज्यभरात हा पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्व ग्राहकांना अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संपूर्ण राज्यात इंधनाची अखंड उपलब्धता राहील, याची खातरजमा करण्यासाठी तेल कंपन्या, तेलांची वाहतूक व्यवस्था, साठ्याचे दळणवळण आणि किरकोळ विक्री व्यवहारांमध्ये समन्वय राखून आहे. नागरिकांनी पेट्रोलियम उत्पादनांची घाबरुन जाऊन खरेदी किंवा साठेबाजी करु नये आणि इंधन वापराची नेहमीची पद्धत कायम ठेवावी अशी विनंती करण्यात येत आहे.
इंधनाच्या उपलब्धतेबाबत अचूक आणि खात्रीशीर माहितीसाठी, केवळ तेल विपणन कंपन्यांकडून जारी केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्लाही नागरिकांना देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule