अशोक खरात ईडीच्या ताब्यात; आर्थिक गैरव्यवहारांची होणार सखोल चौकशी
नाशिक, 19 मे (हिं.स.)।गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे. सकाळी सुमारे नऊ वाजता ईडीचे विशेष पथक ख
ईडी लोगो


नाशिक, 19 मे (हिं.स.)।गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे. सकाळी सुमारे नऊ वाजता ईडीचे विशेष पथक खरातला घेऊन मुंबईकडे रवाना झाले. या कारवाईदरम्यान बंदोबस्तासाठी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या मोठ्या व्हॅनमध्ये अशोक खरातला बसवण्यात आले होते. ईडीकडून आता त्याच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार असून, त्याला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या व्यवहारांचा तपास

अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून काळा पैसा फिरवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ईडीच्या प्राथमिक तपासात अनेक संशयास्पद व्यवहार समोर आले असून, विविध खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. या पैशांचा स्रोत, त्याचा वापर आणि व्यवहारांची साखळी याचा तपास आता ईडी करणार आहे.

बोगस खात्यांची होणार चौकशी

जगदंबा आणि समता पतसंस्थांच्या माध्यमातून अशोक खरातने शेकडो बोगस खाती उघडल्याचा आरोप आहे. या खात्यांमध्ये अनेक ठिकाणी अशोक खरात स्वतः नॉमिनी होता, तर काही खात्यांमध्ये त्याच्या विश्वासातील व्यक्तींना नॉमिनी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व व्यवहारांची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून ही खाती उघडण्यात आल्याचा संशय असून, पतसंस्थांमधील निधी इतरत्र वळवणे, बनावट कर्जप्रकरणे तयार करणे आणि खोटे व्यवहार दाखवून पैसा फिरवणे अशा प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांचाही तपास होणार आहे.

सिन्नर पोलिसांच्या ताब्यात होता खरात

याआधी अशोक खरात हा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर ईडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा ताबा घेतला. त्यापूर्वी तो शिर्डी पोलिसांच्या ताब्यात होता. शिर्डीतून त्याला सिन्नरमध्ये आणण्यात आले होते. यापूर्वी एसआयटीने दाखल केलेल्या नऊ गुन्ह्यांप्रकरणी खरातला न्यायालयात हजर करण्यात आले होते. जवळपास ४२ दिवस तो एसआयटीच्या कोठडीत होता.

ईडीच्या रडारवर आणखी व्यवहार

ईडीकडून आता अशोक खरातच्या मालमत्ता, बँक खाती, नातेवाईकांच्या नावावरील व्यवहार तसेच संशयास्पद आर्थिक नेटवर्कचा तपास सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande