अमरावती विभागाची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप; ९०.९२ टक्के निकाल
अमरावती, 02 मे, (हिं.स.) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९०.९२ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल
अमरावती विभागाची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, ९०.९२ टक्के निकाल गतवर्षीच्या तुलनेत क्रमवारीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप


अमरावती, 02 मे, (हिं.स.) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९०.९२ टक्के लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९१.४३ टक्के लागला होता, यंदा त्यात ०.४१ टक्क्यांची किंचित घसरण झाली असली, तरी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

निकालाच्या टक्केवारीत विभागात गेल्यावर्षी प्रमाणे यंदा बुलढाणा जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के, वाशीम ९१.१५, अकोला ९०.१४, यवतमाळ ८९.६९ तर अमरावती जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ८८.२६ टक्के लागला आहे. मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ३४ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतची टक्केवारी ९०.९२ इतकी आहे.

अमरावती विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.४८ टक्के, कला शाखेचा ८१.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ८९.८७ टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ७५.८७ टक्के तर आयटीआय शाखेचा निकाल ९०.४० टक्के इतका लागला आहे.

यंदाही मुलींचाच वरचष्मा

उत्तीर्णतेच्या बाबतीत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६८ हजार ८४४ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ६४ हजार ६८१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९३.९५ टक्के आहे, तर ७८ हजार ९१० मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६९ हजार ६७१ मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ८८.२९ इतकी आहे.

विद्यार्थ्यास गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळवरून स्वतः किवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ३ मे ते १७ मे २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

जिल्हानिहाय निकाल

बुलढाणा: ९५.२२ टक्के

वाशीम: ९१.१५ टक्के

अकोला : ९०.१४ टक्के

यवतमाळ : ८९.६९ टक्के

अमरावती ८८.२६ टक्के

एकूण : ९०.९२ टक्के

शाखानिहाय टक्केवारी

विज्ञान : ९७.४८ टक्के

वाणिज्य : ८९.८७ टक्के

कला : ८१.३३ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम: ७५.८७ टक्के

आयटीआय : ९०.४० टक्के

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande