समतेच्या संगमावर अवतरली प्रज्ञेची गंगा
नाशिकच्या गोदाकाठी ‘कथा तथागताची’चा भक्तिमय प्रारंभ नाशिक, 02 मे (हिं.स.)। नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या प्रांगणात, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कथा तथागताची’ या त्
The Ganges of wisdom


नाशिकच्या गोदाकाठी ‘कथा तथागताची’चा भक्तिमय प्रारंभ

नाशिक, 02 मे (हिं.स.)।

नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या प्रांगणात, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कथा तथागताची’ या त्रिदिवसीय व्याख्यानमालेचा ऐतिहासिक प्रारंभ झाला. यशवंतराव महाराज पटांगणावर उसळलेला श्रोत्यांचा जनसागर आणि बुद्धमयी वातावरण पाहून नाशिकमध्ये विचारांचे एक नवीन अभिसरण घडत असल्याचा प्रत्यय आला.

सुरुवात महाराष्ट्र गीत आणि वंदेमातरम नृत्य गीत सादरीकरण याने झाली. याप्रसंगी पूजनीय संत स्वामी गोविंदगिरी महाराज यांना वसंत मालेच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले त्याचे वाचन मिलिंद गांधी यांनी केले. स्वागतपर भाषणाने करताना या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे सचिव प्रा. संजय साळवे यांनी एका नव्या सकारात्मक दृष्टिकोनाची मांडणी केली. ते म्हणाले की, आजचा हा सोहळा केवळ कथाश्रवण नाही, तर तो प्रज्ञा, शील आणि करुणेचा सामूहिक अंगीकार आहे. महाराष्ट्राच्या मातीत फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीने जो समतेचा विचार पेरला, त्याचे मूळ तथागत बुद्धाच्या शिकवणुकीत आहे. जेव्हा आपण या महापुरुषांच्या विचारांची सांगड घालतो, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने उन्नत होतो. या वैचारिक मांडणीने कार्यक्रमाची उंची पहिल्याच क्षणी उंचावली.

वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आपल्या प्रास्ताविकात या व्याख्यानमालेच्या गौरवशाली परंपरेचा उलगडा केला. नाशिकच्या ज्ञानविकासात या व्यासपीठाचे योगदान किती मोठे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. तर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी या उपक्रमामागील समरसतेची भावना व्यक्त केली. स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड आणि सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याचे आकर्षण ठरली.

पूजनीय संत गोविंदगिरी महाराज यांनी जेव्हा बुद्ध कथेला प्रारंभ केला, तेव्हा संपूर्ण गोदाकाठ शांत आणि मंत्रमुग्ध झाला होता. विशेष म्हणजे, या कथेसाठी त्यांनी महान बौद्ध भिक्खू आणि कवी अश्वघोष यांच्या ‘बुद्धचरित’ या महाकाव्याचा आधार घेतला आहे. बुद्धाचे बालपण, त्यांचा त्यागाचा प्रवास आणि विश्वशांतीचा संदेश अश्वघोषांच्या लेखणीतून ज्या प्रभावीपणे उतरला आहे, त्याचेच रसाळ निरूपण महाराजांनी केले.

कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला लाभलेला सर्वसमावेशक पाठिंबा. सामाजिक समरसता मंच, आधार महिला मंडळ, संविधान जागर समिती आणि विशेषतः जय भीम आर्मी यांसारख्या विविध संघटनांनी एकत्र येत गोविंदगिरी महाराजांचे आदरपूर्वक स्वागत केले. ही दृश्ये नाशिकच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारी ठरली. व्याख्यान संपल्यानंतरही श्रोते भारावलेल्या अवस्थेत जागेवरच बसून होते. तथागताचा करुणेचा संदेश प्रत्येकाच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात बुद्धाचा मध्यम मार्ग आणि चळवळीतील सकारात्मकता कशी आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच या पहिल्या दिवशी नाशिककरांना मिळाला. येत्या दोन दिवसांत ही विचारांची गंगा अधिक प्रवाही होणार असून, नाशिकचे वातावरण खऱ्या अर्थाने 'बुद्धमय' होणार आहे. याप्रसंगी सर्व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande