
ओझर, 02 मे, (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने ‘गोदा ते नर्मदा’ ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर ते महेश्वर या प्रवासादरम्यान ही जलयात्रा श्री क्षेत्र वेरूळ येथे दाखल झाली.यावेळी जलयात्रेत सहभागी असलेल्या मान्यवरांनी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधी मंदिरास भेट देऊन जगदगुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला.
अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या वेरूळ येथील आश्रमात आलेल्या जलयात्रेत शेतकरी नेते तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर तसेच आमदार प्रशांत बंब यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी यावेळी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिराजी) महाराज यांच्या संकल्पित समाधी मंदिराचे दर्शन घेतले. तसेच आश्रमातील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रवक्ते विवेकानंद महाराज, भरत शास्त्री महाराज, दयानंद महाराज यांसह आश्रमीय पदाधिकारी व भाविक मोठ्या उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV