
परभणी, 02 मे (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या बागेश्वर बाबा आणि आंनद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर आदींनी जिल्हाधिकार्यांर्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना एक निवेदन पाठवले. त्याद्वारे, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू, मराठा, बहुजन तसेच अठरा पगड जातींच्या अस्मितेचे प्रतीक असताना काही व्यक्तींनी त्यांच्या इतिहासाबाबत गैरसमज निर्माण करणारी विधाने केली आहेत. बागेश्वर बाबा यांनी महाराजांबाबत केलेले वक्तव्य तसेच स्वामी आनंद स्वरूप यांनी युद्ध पेशव्यांनी लढले आणि नाव शिवाजींचे झाले असे विधान करून महाराजांचा अवमान केल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. अशा प्रकारची विधाने समाजात संभ्रम निर्माण करणारी असून ती निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis