


रायगड, 02 मे (हिं.स.)। मराठी भाषा, संस्कृती, मराठी शाळा आणि स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”ची स्थापना करण्यात आली असून त्याचा भव्य शुभारंभ सोहळा नुकताच आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह देश-विदेशातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यास आमदार सुभाष बापू देशमुख, ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच जागतिक स्तरावरील उद्योजक संजय वायाळ, लंडन येथील वैज्ञानिक डॉ. उदय भोसले आणि दुबईतील उद्योजक आप्पासाहेब कोंढारे हे विशेष उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे महापूजन करून करण्यात आली. त्यानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या मंदिरापासून सभागृहापर्यंत दिंडी काढण्यात आली.
प्रास्ताविकात आमदार सुभाष देशमुख यांनी “लोकल टू ग्लोबल” आणि “ग्लोबल टू लोकल” ही संकल्पना मांडत मराठी शाळा, ग्रामीण भागातील उद्योग आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी युवकांना रोजगार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंढरपूर ते आळंदी सायकलवारी करणाऱ्या सायकलवीरांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळा दत्तक घेणाऱ्या उद्योजकांचा गौरवही करण्यात आला. आळंदी येथे फाउंडेशनची पहिली स्थानिक समिती स्थापन करण्यात आली. भक्तीमय वातावरणात पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. मराठी अस्मिता आणि सामाजिक विकासासाठी “विश्वमंगल मराठी फाउंडेशन” महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)