बारावीचा 89.79 टक्के निकाल, कोकण सर्वाधिक 94.14 टक्के
मुंबई, 02 मे (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज, शनिवारी मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला. निकालाची वैशिष्ट्ये
निकाल


मुंबई, 02 मे (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज, शनिवारी मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 89.79 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळ निहाय निकाल

कोकण विभागातील 94.14 टक्के, पुणे 91.25 टक्के, अमरावती 90.92 टक्के, नाशिक 90.72 टक्के, मुंबई 90.08 टक्के, कोल्हापूर 89.97 टक्के, छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के, नागपूर 88.67 टक्के आणि लातूर विभागातील 84.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.80 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 6.35 टक्क्यांनी जास्त आहे.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,42,697 विद्यार्थी प्रावीण्यासह, 3,62,033 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,81,519 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 2,00,594 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधारसाठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande