
येवला, 02 मे, (हिं.स.)। राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला संपर्क कार्यालयात येवला तालुक्यातील जनगणना टप्पा एक स्वगणना कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जनगणना टप्पा एक अंतर्गत ऑनलाईन स्वगणना अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.
केंद्र सरकारने भारतीय जनगणनेला सुरुवात केली असून राज्यात १ मे पासून जनगणना टप्पा क्रमांक एक अर्थात १ मे ते १५ मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तसेच दि.१६ मे ते १४ जून पर्यंत प्रगनक आपल्या दारी येऊन ही जनगणना करणार आहेत.
दरम्यान नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्व गणना प्रणालीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली स्वगणना करून स्वतः ऑनलाईन फॉर्म भरत या प्रणालीचा शुभारंभ केला. यावेळी नागरिकांनी देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी जनगणना करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन, अपर तहसीलदार शितल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला मुख्याधिकारी तुषार आहेर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नगरसेवक गोटू मांजरे, शहराध्यक्ष दत्ता निकम यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV