
रत्नागिरी, 02 मे (हिं.स.) । जयगड बंदर येथे उभ्या असलेल्या ‘आमीर गॅस’ या जहाजावर मुंबई उच्च न्यायालयाने तत्काळ जप्तीचे आदेश दिल्याने सागरी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्णायक कारवाई केली.
‘झंग युनियन इंटरनॅशनल’ या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर जहाजाच्या व्यवहारांवर संशय निर्माण झाला. प्राथमिक तपासात जहाजाच्या व्यवस्थापन कंपनीने दुबईमध्ये चुकीची माहिती सादर केल्याचे, तसेच जयगड बंदरात प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे.
गंभीर बाब म्हणजे या जहाजाचे दोन वेगवेगळे मालक असल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्यातील वादामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने जहाज जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने जहाजावरील ‘एलपीजी (मिक्स) इन बल्क’ माल उतरवण्यास बंदी घालत JSW जयगड पोर्ट लिमिटेडला ‘आऊटवर्ड पोर्ट क्लिअरन्स’ न देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये यासाठी कडक देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे जहाज भाडेकरारावर घेण्यात आले होते. त्यावरील गॅसचा साठा इराकमध्ये भरून पाकिस्तानात पाठवण्याचे नियोजन होते. मात्र, मध्येच जहाजाचा मास्टर बदलून आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून जहाज भारताकडे वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनप यांनी न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा दिला असून सध्या हे जहाज जयगड बंदरात कडक पोलीस व सागरी सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे समोर येत असल्याने पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी