
मुंबई, 20 मे (हिं.स.) - पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका. राज्यात आणि देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांमुळेच पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो. केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, देशाकडे पेट्रोल-डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा उपलब्ध आहे आणि पुरवठाही नियमित सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर आणि विविध ठिकाणी तुटवड्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत आहेत. त्यामुळे अफवा पसरवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, पुरवठा साखळी ही अनेक वर्षांच्या वापराच्या अंदाजावर आधारित असते. एखाद्या तालुक्यात किंवा पेट्रोल पंपावर दररोज किती इंधनाची गरज असते, यानुसार पुरवठा केला जातो. पण अचानक लोकांनी जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरायला सुरुवात केली, तर संपूर्ण साखळीवर ताण येतो. यासाठी बँकेचं उदाहरण देऊन ते म्हणाले, जर एका दिवशी सर्व लोकांनी बँकेत जाऊन पैसे काढायला सुरुवात केली, तर बँकेवर अचानक ताण येतो. याचा अर्थ बँकेकडे पैसे नाहीत असा होत नाही. तशीच परिस्थिती पेट्रोल-डिझेल पुरवठ्याची आहे. जागतिक परिस्थिती सध्या तणावपूर्ण असली, तरी भारताने आपली पुरवठा व्यवस्था सक्षम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि इंधनाचा वापरही जबाबदारीने करावा, असे आवाहनही केले.
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील नागरिकांना दिलासा देत राज्यात किमान एक महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. मात्र राज्यात कोणतीही तातडीची कमतरता नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी