क्युबावरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे युएसएस निमित्झ कॅरिबियनमध्ये दाखल
वॉशिंग्टन , 21 मे (हिं.स.)।अमेरिका आणि क्यूबा यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे आता लष्करी स्तरावरही हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ आपल्या स्ट्राइक ग्रुपसह कॅरिबियन समुद्रात दाखल झाले आहे.अहवालात ही माहिती समोर
क्युबावरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे युएसएस निमित्झ कॅरिबियनमध्ये दाखल


वॉशिंग्टन , 21 मे (हिं.स.)।अमेरिका आणि क्यूबा यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे आता लष्करी स्तरावरही हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ आपल्या स्ट्राइक ग्रुपसह कॅरिबियन समुद्रात दाखल झाले आहे.अहवालात ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबाविरोधातील आक्रमक भूमिका अधिक तीव्र करत कारवाईची धमकी दिल्यानंतर ही तैनाती करण्यात आली आहे. अहवालानुसार, या मोहिमेचा उद्देश या प्रदेशातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती अधिक मजबूत करणे हा आहे.

अमेरिकन नौदलाच्या या शक्तिशाली स्ट्राइक ग्रुपमध्ये एफ/ए-18ई सुपर हॉर्नेट लढाऊ विमाने, ईए-18जी ग्रोलर इलेक्ट्रॉनिक युद्धक विमाने आणि सी-2 ग्रेहाउंड सहाय्यक विमानांचा समावेश आहे. याशिवाय यूएसएस ग्रिडली ही विध्वंसक युद्धनौका आणि यूएसएनएस पटक्सेंट हे इंधन पुरवठा करणारे जहाजही तैनात करण्यात आले आहे. अमेरिकेच्या दक्षिणी कमांडने याची पुष्टी करताना सांगितले की, यूएसएस निमित्झने तैवान सामुद्रधुनीपासून अरबी आखातापर्यंत विविध भागांत स्थैर्य राखणे आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यामध्ये आपली युद्धक्षमता सिद्ध केली आहे.

१९७५ मध्ये सेवेत दाखल झालेल्या या विमानवाहू युद्धनौकेने अलीकडेच रिओ डी जानेरो किनाऱ्याजवळ ब्राझीलच्या नौदलासोबत संयुक्त नौदल सरावात सहभाग घेतला होता. ब्राझीलमधील अमेरिकन दूतावासाने यासंदर्भातील माहिती दिली होती. अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाने अलीकडच्या काळात क्यूबाविरोधातील भूमिका अधिक कठोर केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने क्यूबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांच्यावर १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात दोन नागरी विमानं पाडल्याप्रकरणी हत्या आणि इतर गुन्ह्यांचे औपचारिक आरोप दाखल केले आहेत. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. ट्रम्प यांनी या कारवाईला क्यूबा-अमेरिकन समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. केवळ क्यूबा-अमेरिकन लोकांसाठीच नव्हे, तर क्यूबातून अमेरिकेत आलेल्या आणि पुन्हा क्यूबात जाऊन आपल्या कुटुंबीयांना भेटू इच्छिणाऱ्या लोकांसाठीही हा मोठा क्षण आहे.” अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी क्यूबाच्या जनतेसाठी स्पॅनिश भाषेत संदेश जारी केला. त्यांनी क्यूबाच्या कम्युनिस्ट सरकारला वीजटंचाई आणि आर्थिक संकटासाठी जबाबदार धरले. रुबिओ यांनी अमेरिकेच्या इंधन नाकेबंदी धोरणालाही समर्थन दिले.

सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी अलीकडेच क्यूबाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चर्चेची संधी कायमस्वरूपी खुली राहणार नाही. या वक्तव्यानंतर राजनैतिक वर्तुळात तणाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande