

कल्याण, 22 मे (हिं.स.)। कल्याण परिमंडळ ३ च्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये किमतीचे ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणात कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद युसुफ पठाण याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीचे धागेदोरे मुंबईतील गोरेगाव नेक्सो प्रकरणाशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांचे पथक बुधवारी पहाटे कल्याण परिसरात गस्त घालत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास सांगळेवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन संशयित इसम पाठीवर बॅग घेऊन जाताना दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी आपली नावे कासिम अब्दुल सत्तार वसईकर आणि कृष्णा नागप्पा हळेमणी अशी सांगितली. त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यातून ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय ३९ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. त्यानंतर शाहपूर येथील कासिम वसईकरच्या घराची झडती घेतली असता आणखी ५३१ ग्रॅम हेरॉईन सापडले. त्यामुळे एकूण जप्ती ९ किलो ७६८ ग्रॅमपर्यंत पोहोचली.
तपासादरम्यान या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद युसुफ पठाण असल्याचे उघड झाले. अमजद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये तब्बल २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने ही हेरॉईन मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरातील गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले. सद्दाम गफुर शेख आणि कासिम वसईकर हे दोघे अमजदचा माल किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवत होते.
महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमजद पठाणला न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या धाडसी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule