
मुंबई, 22 मे (हिं.स.): “विकसित भारत २०४७” च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान दळणवळण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या व्यापक विकास आराखड्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दि हिंदू कॉन्क्लेव्ह’मध्ये “मुंबई ते सुरजागड – समृद्धीचा महामार्ग” या विषयावर बोलताना त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, गृहनिर्माण, परिवहन, पर्यावरण आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांतील विकासाचा विस्तृत आढावा मांडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आणि गडचिरोलीसारखे दुर्गम भाग हे नैसर्गिक व औद्योगिक संपत्तीने समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील विकास केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता तो ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांपर्यंत पोहोचवण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, स्टील प्रकल्प आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली असून कोस्ट टू फॉरेस्ट असा विकासाचा प्रवास गेल्या काही वर्षांत घडवून आणला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
गडचिरोलीचा पालकमंत्री असताना नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिक, आदिवासी समाज आणि पोलिसांशी संवाद साधत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
रक्षाबंधन आणि दिवाळीसारखे सणही जवानांसोबत गडचिरोलीत साजरे केल्याचे सांगत त्यांनी, “दुर्गम भागाचा विकास करायचा असेल, तर तेथील समाजाशी भावनिक नाते जोडणे आवश्यक असते असे सांगितले.
*पायाभूत सुविधांसह रोजगारनिर्मितीवर भर*
गडचिरोलीत रस्ते, पूल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट आणि प्रशासनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ सुविधा नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणे ही सरकारची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
*टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र*
टाटा समूहासोबत चर्चा करून स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकासाची संकल्पना पुढे आणण्यात आली. त्यातून १७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आले. गडचिरोलीत अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हे केंद्र दरवर्षी सुमारे ४,८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजक निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*नक्षलवादावर नियंत्रण*
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यात उद्योग, रस्ते, इंटरनेट सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत.
*गडचिरोलीत हजारो कोटींची गुंतवणूक*
कोनसरी येथे लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत २० हजार कोटी रुपयांच्या ‘इंटिग्रेटेड स्टील प्लांट’साठी सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय सुरजागड इस्पातच्या माध्यमातून आणखी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून सुमारे ८ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
*समृद्धी महामार्गाशी सुरजागडची जोडणी*
सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी ८५ किलोमीटरच्या ग्रीनफिल्ड रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार असून मुंबई ते गडचिरोली प्रवास ९ ते १० तासांमध्ये पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्यासही मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
*‘डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट’मधून मोठी रोजगारनिर्मिती*
गडचिरोलीत आयोजित ‘डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट-२०२५’मध्ये १२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामधून १७,४३१ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १.४४ लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*मुंबई आणि एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचा संकल्प*
मुंबई हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक क्षेत्र बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे.
नीती आयोगाने दिलेल्या रोडमॅपनुसार मुंबईचा जीडीपी दुप्पट करण्यासाठी आणि मुंबईला ‘ग्लोबल फिनटेक कॅपिटल’ बनवण्यासाठी राज्य सरकार वेगाने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*४ लाख कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती*
एमएमआरमध्ये सध्या जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. अटल सेतू, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, मेट्रो विस्तार, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, मेट्रो लाईन-३ आणि वाढवण बंदर हे राज्याच्या भविष्यासाठी गेमचेंजर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
*‘६० मिनिटांची मुंबई’ हे लक्ष्य*
मुंबईतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित केली जात आहे. “मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ६० मिनिटांत पोहोचता आले पाहिजे,” हे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमएमआरमध्ये ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारले जात असून मेट्रो लाईन्स २बी, ४, ५, ६, ७ए, ९ आणि १२ मुळे शहरी वाहतुकीत मोठा बदल होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर