राज्यातील एसआयआर प्रक्रिया पारदर्शक; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही : एस. चोकलिंगम
मुंबई, 22 मे (हिं.स.)। राज्यात सुरू करण्यात आलेली विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर)अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी केले जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलि
State SIR Process Transparent No Eligible Voter Name Will Be Omitted S. Chokalingam


मुंबई, 22 मे (हिं.स.)। राज्यात सुरू करण्यात आलेली विशेष सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर)अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी केले जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले आहे. राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील जवळपास ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशीलांची घराघरात जाऊन पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी राज्यभरात तब्बल १ लाख २५३ बूथ लेव्हल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ कर्मचाऱ्यांना 20 ते 29 जून पर्यंत विशेष प्रशिक्षण दिले जाईल. जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेला वेगाने सुरुवात होणार असून ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत अधिकारी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत.

चोकलिंगम यांनी सांगितले की, २००२ सालच्या मतदार याद्यांच्या आधारे मॅपिंग केले जाणार आहे. मतदारांनी स्वतःचे किंवा त्यांच्या पालकांचे नाव जुन्या यादीत आहे का, हे तपासून पाहावे. सध्या राज्यातील सुमारे ७२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी मतदार संबंधित पत्त्यावर वास्तव्यास आहेत का, याची खातरजमा करतील. स्थलांतरित किंवा मृत व्यक्तींची नावे यादीतून वगळली जातील, तर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे समाविष्ट केली जातील. अधिकाऱ्यांनी घरी भेट दिली असताना संबंधित व्यक्ती उपस्थित नसल्यास २९ जुलैनंतरही नाव नोंदवण्याची सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुंबईसारख्या शहरांमध्ये पुनर्विकासामुळे अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. अशा नागरिकांनी स्थानिक बूथ लेव्हल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक अर्ज भरावेत, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. याशिवाय नागरिकांना घरबसल्या माहिती अद्ययावत करता यावी यासाठी ऑनलाईन स्व-मॅपिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल अनुप्रयोगावर जाऊन विशेष सखोल पुनरीक्षण यादीत नाव आहे की नाही, हे तपासता येणार आहे. राज्य, जिल्हा, मतदारसंघ आणि मतदान केंद्राची माहिती भरल्यानंतर जुनी मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. नाव नसल्यास मतदार ओळखपत्र, आधारकार्ड तसेच पालकांचे नाव २००२ च्या यादीत असल्याचा तपशील देऊन नाव समाविष्ट करता येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. सर्व आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande