वांद्र्यात ८५ टक्क्यांहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, मोठा पोलिस बंदोबस्त
मुंबई, 22 मे (हिं.स.) - वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने वेग पकडला. आतापर्यंत ९० टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दगडफेक, लाठीचार्जमुळे दुसरा दिवस गाजला होता; मात्र आता या परिसरात तणावपूर्
वांद्रे तोडकाम


वांद्रे तोडकाम


वांद्रे तोडकाम


मुंबई, 22 मे (हिं.स.) - वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने वेग पकडला. आतापर्यंत ९० टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दगडफेक, लाठीचार्जमुळे दुसरा दिवस गाजला होता; मात्र आता या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तीन दिवसांच्या या कारवाईत ५००पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामांपैकी ४००हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून, उर्वरित कारवाई पुढील दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. एका बाजूला अर्धवट पडलेल्या झोपड्या हटविण्याचे काम सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला मलबा हटवण्यासाठी ट्रकची ये-जा सुरू आहे. बुधवारच्या घटनेनंतर या भागात मोठा पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता.

दिवसभर पाडकाम आणि रात्री मलबा हटविण्याचे काम अशा दुहेरी पद्धतीने ही मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण कारवाईसाठी १३ मशीन वापरल्या जात आहेत. दररोज सुमारे ४० ट्रकद्वारे ८० ते ९० मेट्रिक टन मलबा हटवला जात आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, २३ मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, त्यानंतरही मलबा हटविणे, परिसर साफसफाई आणि बॅरिकेडिंगची कामे काही दिवस सुरू राहतील. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान गरीब नगर दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून दगडफेकीत त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. या हिंसाचार प्रकरणी पोलीस इतर फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

बेघर झालेल्या नागरिकांसाठी रेल्वेकडून मदतदेखील सुरू आहे. गुरुवारी दोन हजारांहून अधिक पाण्याच्या बाटल्या व पाकीटबंद जेवणाचे वाटप करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक्रमणमुक्त जागेवर भविष्यात इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारण्याची रेल्वेची योजना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande