
अमरावती, 25 मे (हिं.स.)
तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विभाग विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सोमवार, 25 मेपासून अधिकृत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह आठ जणांनी एकूण 16 उमेदवारी अर्जाची उचल केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून उमेदवारी अर्जदाखल करण्यासाठी आवश्यक नियम व अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 10 हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 5 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच अर्जासोबत मतदार यादीतील किमान 10 सूचकांच्या स्वाक्षर्या अनिवार्य राहणार आहेत. याशिवाय उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी, चल-अचल मालमत्ता, शासकीय निवासस्थान यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र न्यायदंडाधिकारी किंवा नोटरीसमोर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणताही रकाना रिकामा ठेवू नये, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असल्याची प्रमाणित प्रत अथवा मतदार नोंदणी अधिकार्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व त्यामागे उमेदवाराची स्वाक्षरी आवश्यक राहणार आहे.यापूर्वी 24 मे 2018 रोजी या मतदारसंघाची मतमोजणी पार पडली होती. त्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असून, 2 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 4 जूनला अर्ज माघारीची अंतिम तारीख राहणार असून, 18 जून रोजी मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार आहे. अवघ्या 28 दिवसांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. निवडणुकीदरम्यानआचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र तीन पथकांची नियुक्ती केली आहे. विविध विभागांसाठी नोडल अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महापालिकेतील आठ तसेच विविध नगरपालिकांतील 34 स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने या सदस्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. या मतदारसंघात एकूण 453 मतदार असून त्यामध्ये 226 महिला व 227 पुरुष मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून राजकीय समीकरणांना वेग आला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरक्षेच्या दृष्टीनेही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कक्षाबाहेरील 100 मीटर परिसरात केवळ तीन वाहनांनाच प्रवेश राहणार आहे. तसेच उमेदवारासह फक्त पाच जणांनाच अर्ज दाखल करताना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी