
लातूर, 25 मे (हिं.स.)। मोटेगावकरांच्या संपत्तीवर ईडीची नजर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाला आता एक मोठे आर्थिक वळण मिळाले आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अटकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने या प्रकरणात अधिकृत एन्ट्री केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध 'आरसीसी' कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर आता ईडीच्या रडारवर आले असून, त्यांच्या अफाट संपत्तीची आणि मनी लाँड्रिंगच्या कोनातून चौकशी सुरू झाली आहे.
सीबीआयने केलेल्या अटकेनंतर या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ईडीने मोटेगावकर यांच्यावर आपला फास आवळण्यास सुरुवात केली आहे. ईडीने शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या सर्व बँक खात्यांचे तपशील गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नीट परीक्षेचे मूळ प्रश्न मॉक टेस्ट किंवा गेस पेपरच्या नावाखाली विद्यार्थ्यांना देण्यासाठी पालकांकडून लाखो रुपयांची रोख रक्कम उकळण्यात आल्याचा संशय आहे. हा पैसा कुठे व कसा वळवण्यात आला, याचा माग ईडी घेत आहे. आरसीसी क्लासेसच्या महाराष्ट्रातील ९ शाखा, कार्यालये आणि मोटेगावकरांच्या इतर मालमत्तांची चौकशी केली जात असून, गुन्ह्यातून कमावलेल्या पैशातून ही संपत्ती उभी राहिली आहे का, याचा तपास सुरू आहे.
यापूर्वी सीबीआयने लातूर आणि पुण्यात मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकर यांना रविवारी रात्री ताब्यात घेऊन दिल्लीत नेले होते, जेथे न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या तब्बल १० दिवस आधी, म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजीच शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलवर नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी साठी मराठी भाषांतरकार म्हणून काम करणारे निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (ज्यांना आधीच अटक झाली आहे) यांच्याशी मोटेगावकरांचे थेट कनेक्शन होते. कुलकर्णी यांच्याकडूनच मोटेगावकरांना पेपर मिळाल्याचा संशय आहे.
सीबीआयने मोटेगावकरांच्या लातूर येथील शिवाजी नगर भागातील निवासस्थानावर आणि आरसीसी क्लासेसवर टाकलेल्या छाप्यात एक केमिस्ट्री केथन बँक जप्त केली आहे. या क्वेश्चन बँकेतील तब्बल ४२ प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे (हुबेहूब) आल्याचे फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. लातुरात हा प्रकार एका पालकाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर समोर आला. त्यातच सोशल मीडियावर मोटेगावकरांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते स्वतः विद्यार्थ्यांना विचारत होते की, आपल्या मॉक टेस्ट (सराव परीक्षा) मधील किती प्रश्न मुख्य परीक्षेत आले? त्यावर विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न जसेच्या तसे आले असे उत्तर दिले होते. हा व्हिडिओ आता सीबीआय आणि ईडीसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आहे.
या प्रकरणात पुणे आणि लातूरमधील काही डॉक्टर, आयुर्वे दिक तज्ज्ञ आणि मध्यस्थांची साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले असून, मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे या महिला आरोपींच्या घरातून लाखो रुपयांची रोकड, जळालेल्या प्रश्नपत्रिकांच्या नोट्स आणि संशयास्पद व्हॉट्सप चॅट्स हस्तगत करण्यात आले आहेत. शिवराज मोटेगावकर यांच्यावर पुरावे नष्ट करणे, एनटीए अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी कट रचणे यासाठी भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता ईडीच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्रातील कोचिंग लॉबीचे मोठे रॅकेट उद्धस्त होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis