उदगीरमध्ये संत गाडगेबाबा पुतळ्याचे काम रखडले,उपोषणाचा इशारा
लातूर, 25 मे (हिं.स.) : उदगीर शहरातील राष्ट्रीय संत कर्मयोगी गाडगेबाबा महाराज चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम मागील पाच ते सहा महिन्यांपासून रखडल्याने शहरातील समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पा
निवेदन


लातूर, 25 मे (हिं.स.) : उदगीर शहरातील राष्ट्रीय संत कर्मयोगी गाडगेबाबा महाराज चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम मागील पाच ते सहा महिन्यांपासून रखडल्याने शहरातील समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष चे उपजिल्हा प्रमुख तेलंगे विनोद आणि संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल गाजरे यांनी उदगीर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छता, समाजप्रबोधन आणि मानवसेवेचे प्रतीक असून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजासमोर कायम राहावा या उद्देशाने चौकात पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले होते. चौथऱ्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असताना अचानकपणे पुढील काम बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सदर काम तात्काळ सुरू करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच येत्या चार दिवसांत काम सुरू न झाल्यास सर्व समाज बांधव आणि गाडगेबाबा महाराजांच्या अनुयायांच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तेलंगे विनोद, संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल गाजरे, गजेंद्र पिपळे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी तेलंगे, प्रशांत शिंदे, संतोष गाजरे, विजय तेलंगे, बालाजी भालेराव, माधव गाजरे, नागराळकर रामराव यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande