
सोलापूर, 25 मे (हिं.स.) : प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सोलापूर विभागाने कामावर हजर असताना मद्यपान करणाऱ्या चालकांवर आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. बसस्थानकातील आगारात ड्युटीवर येणाऱ्या सर्व चालकांची आता नियमितपणे अल्कोटेस्ट मशिनद्वारे तपासणी केली जात आहे.
चालक मद्यपान करून कामावर आल्यास त्याची तत्काळ ओळख पटवून संबंधितांवर कारवाई करता येणार असून, संभाव्य अपघात टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. ऑनड्युटी मद्यपानामुळे उद्भवणारे धोके रोखण्यासाठी महामंडळाने नवे नियम लागू करत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
याच धर्तीवर सोलापूर विभागातील नऊ आगारांमध्ये दररोज चालकांची अल्कोटेस्ट केली जात आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या बस चालकांसोबतच वाहकांचीही मद्यपान तपासणी करण्यात येत आहे. संबंधित तपासणी नियमितपणे पार पडत आहे की नाही, यावर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, निष्काळजीपणाला आळा बसणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड