
रायगड, 26 मे, (हिं.स.)। : ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतींकडे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींनी करण्यात येणाऱ्या प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी कामाचे नाव, योजना, निधीचा स्रोत, काम सुरू व पूर्ण झाल्याची तारीख तसेच खर्चाची रक्कम नमूद असलेला फलक लावणे आवश्यक आहे. चौदावा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत निधी तसेच इतर विकास योजनांमधून होणाऱ्या सर्व कामांसाठी हे नियम लागू आहेत.
परिपत्रकानुसार माहिती फलक लावण्यामागचा उद्देश म्हणजे ग्रामस्थांना विकासकामांची माहिती मिळणे, निधीच्या वापरात पारदर्शकता राखणे, भ्रष्टाचाराला आळा बसणे आणि सामाजिक लेखापरीक्षण सुलभ होणे हा आहे. ग्रामपंचायत परिसरात, नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी तसेच संबंधित कामाच्या जागेवर हे फलक लावणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही ग्रामपंचायतींमध्ये अद्यापही विकासकामांचे फलक दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “जर लाखो रुपयांची कामे झाली असतील तर फलक कुठे आहेत?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. कामांचा खर्च, निधीचा स्रोत आणि काम पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शासन पारदर्शक प्रशासनाचा आग्रह धरत असताना ग्रामपंचायतींनीही नियमांचे पालन करून विकासकामांची माहिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)