मनमाडमध्ये गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा महिलेचा आरोप
मनमाड, 26 मे (हिं.स.) : मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गांजा विक्री प्रकरणात आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारांना वाचवले जात असल्याचा दावा करत तिने थेट राज्याचे ग
मनमाडमध्ये गांजा प्रकरणात पतीला अडकवल्याचा महिलेचा आरोप


मनमाड, 26 मे (हिं.स.) : मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गांजा विक्री प्रकरणात आपल्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारांना वाचवले जात असल्याचा दावा करत तिने थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कल्पना बाळू भोसले असे तक्रारदार महिलेचे नाव असून, त्यांच्या पती बाळू वामन भोसले यांच्यावर गांजा विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात विकास पोपट शिंदे आणि गोगा सांगळे यांनीच संबंधित गांजा ठेवून पतीला अडकवल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांचा कबुलीजबाब नोंदवला असून, त्यात काही राजकीय नेत्यांची नावे आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार स्पष्ट असूनही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे. राजकीय दबावामुळे त्यांना संरक्षण मिळत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या प्रती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी (मनमाड) आणि मनमाड शहर पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande