
कांदा, कर्जमाफी, इंधन दरवाढ आणि पेपरफुटीवर सरकारला सुनावले
अमरावती, २६ मे (हिं.स.) : शिवसेना नेते बच्चू कडू यांनी कांदा खरेदी, कर्जमाफी, डिझेल-पेट्रोल दरवाढ, विधान परिषद निवडणूक आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवर राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली.
कांदा खरेदीचा निर्णय योग्य असला तरी तो अपुरा असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधी देण्याची मागणी केली. “कांद्याचे उत्पादन खर्चही निघत नाहीत. त्यामुळे सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,” असे ते म्हणाले.
विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केल्याचे स्वागत करतानाच त्यांनी काँग्रेस पक्षवरही निशाणा साधला. “सत्तेबाहेर असताना शेतकरी आठवतात आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेसच्या काळातही कांदा उत्पादकांची अशीच अवस्था होती,” असा टोला त्यांनी लगावला.
कापसाच्या दराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांनी सत्तेबाहेर असताना कापसाला सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी केली होती, मात्र सत्ता आल्यानंतर त्याबाबत शांत राहिल्याचे बच्चू कडू म्हणाले.
कर्जमाफीचा जीआर काढण्याची मागणी
कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीसाठी आचारसंहितेतून सूट घेण्याची गरज नाही. “कर्जमाफीची घोषणा आधीच झाली आहे. अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर त्यावर आचारसंहितेचा अडथळा येत नाही,” असे ते म्हणाले.
तसेच ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली. “ही योजना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे. त्यामुळे त्याच दिवशी जीआर निघावा,” असे त्यांनी नमूद केले.
डिझेलसाठी आरक्षणाची मागणी
डिझेल-पेट्रोल दरवाढीवर भाष्य करताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल आरक्षणाची मागणी केली. “पेरणीचा हंगाम सुरू होत आहे. ट्रॅक्टर बंद पडता कामा नये. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्यासाठी विशेष सवलत द्यावी,” असे ते म्हणाले.
सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल दरवाढ झाली असली तरी केंद्र आणि राज्य सरकारने दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
विधान परिषद निवडणुकीवर भाष्य
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सर्व निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि आपण त्या निर्णयाशी बांधील राहू, असे स्पष्ट केले.
“माझे काम शिवसेना वाढवणे आणि शिवसैनिक तयार करणे आहे. कोण मंत्री होणार किंवा आमदार होणार, याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही,” असे ते म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजारावर टीका करताना त्यांनी, “याला घोडेबाजार म्हणणे कमी पडेल, हा तर हत्ती बाजार आहे,” अशी टीका केली.
‘कॉकरोज पार्टी’ला समर्थन
“कॉकरोज पार्टी” संदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी त्या संघटनेला समर्थन दर्शवले. “फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता त्यांनी रस्त्यावर उतरून विधायक काम करावे. सरकारवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून संबंधितांचे अकाउंट हॅक केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत, “तरुणांना दडपण्याऐवजी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे आणले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पेपरफुटीविरोधी कायद्याचा उल्लेख
पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कायद्याचा उल्लेख केला. “पेपरफुटीविरोधी कायद्यासाठी पहिले पत्र मी दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर्नाटकनंतर महाराष्ट्रात हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार,” असे त्यांनी सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी