जळगावात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान हायव्होल्टेज ड्रामा
माजी महापौर दीपमाला काळे यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम जळगाव, २६ मे (हिं.स.) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान मोठा नाट्यमय प्रकार घडला
जळगावात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान हायव्होल्टेज ड्रामा


माजी महापौर दीपमाला काळे यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

जळगाव, २६ मे (हिं.स.) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मंगळवारी कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान मोठा नाट्यमय प्रकार घडला. वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबवूनही फेरीवाले पुन्हा त्याच ठिकाणी कसे येतात, असा संतप्त सवाल करत माजी महापौर दीपमाला काळे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे धारेवर धरले.

स्टेडियम परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी करण्यासाठी दीपमाला काळे स्वतः घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यावेळी परिसरात पुन्हा अतिक्रमण दिसून आल्याने त्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

“इथे वारंवार कारवाईचा केवळ देखावा केला जातो. प्रशासनाच्या नाकाखालून हॉकर्स पुन्हा त्याच जागेवर कसे येतात? हप्ते घेण्याचं काम मात्र लगेच होतं,” असा थेट आरोप त्यांनी अधिकाऱ्यांवर केला. तसेच, “पुन्हा जर येथे हॉकर्स दिसले तर तुम्ही सगळे सस्पेंड व्हाल,” अशा कठोर शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना इशाराही दिला.

माजी महापौरांच्या या तीव्र भूमिकेमुळे उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच बोलती बंद झाल्याचे पाहायला मिळाले. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसर हा शहरातील अत्यंत गजबजलेला भाग मानला जातो. पालिकेकडून वारंवार अतिक्रमण हटाव कारवाई केली जात असली तरी काही तासांतच फेरीवाले पुन्हा रस्ते आणि फूटपाथ व्यापत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर दीपमाला काळे यांनी थेट मैदानात उतरून अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande