शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’; गुंतवणूकदारांचे ५.१७ लाख कोटी रुपये बुडाले
नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली मोठ्या प्रमाणातील विक्री आणि नफावसुलीच्या दबावामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळे
Stock Market Closing


नवी दिल्ली, 29 मे (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली मोठ्या प्रमाणातील विक्री आणि नफावसुलीच्या दबावामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. दिवसभर बाजारात विक्रीचा जोर कायम राहिल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवली. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ५.१७ लाख कोटी रुपयांची घट झाली.दिवसभराच्या व्यवहारानंतर, सेन्सेक्स १.४४ टक्क्यांच्या घसरणीसह आणि निफ्टी १.५० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

सकाळी व्यवहाराची सुरुवात मिश्र स्वरूपात झाली होती. सुरुवातीच्या खरेदीमुळे सेन्सेक्स ७६ हजार २२० अंकांपर्यंत पोहोचला होता, तर निफ्टीनेही २४ हजार २ अंकांचा स्तर गाठला. मात्र सकाळी दहा वाजल्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागला. दुपारनंतर नफावसुलीचा वेग आणखी वाढल्याने दोन्ही निर्देशांक कोसळले. सेन्सेक्स दिवसातील उच्चांकी स्तरावरून तब्बल १ हजार ६३० अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये ५१८ अंकांची पडझड झाली. अखेरच्या व्यवहारात सेन्सेक्स १ हजार ९२ अंकांच्या घसरणीसह ७४ हजार ७७५ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी ३५९ अंकांनी घसरून २३ हजार ५४७ अंकांवर स्थिरावला. दिवसभरातील घसरणीमुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

क्षेत्रनिहाय निर्देशांकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, तेल आणि वायू, धातू, वाहन, बँकिंग, भांडवली वस्तू, आरोग्य सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि टिकाऊ उपभोग्य वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी विक्री झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही समभागांमध्ये खरेदी झाल्याने त्या क्षेत्राचा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल घसरून ४६४.९८ लाख कोटी रुपयांवर आले. मागील व्यवहारात हे मूल्य ४७०.१५ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांना ५.१७ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, विप्रो, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या समभागांनी वाढ नोंदवली. तर इंटर ग्लोब एव्हिएशन, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि ओएनजीसी यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande