
मुंबई, 30 मे (हिं.स.)। टोयोटा किर्लोस्कर मोटरनं भारतीय बाजारात आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार, अर्बन क्रूझर एबेला, सादर केली असून मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्ही विभागात नव्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. टॉप-स्पेक ई३ व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत २३.६० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मरुती सुझुकी ई-विटारासोबत प्लॅटफॉर्म शेअर करणारी ही कार ह्युंडाई क्रेटा इलेक्ट्रिक, एमजी झेडएस ईव्ही आणि टाटा कर्व ईव्ही यांच्याशी थेट टक्कर देणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत एबेला ई-विटाराची आठवण करून देते, मात्र टोयोटाच्या स्वतंत्र शैलीत ती अधिक उठावदार दिसते. स्कल्प्टेड बोनेट, बाजूला स्पष्ट कॅरेक्टर लाईन्स, अॅरोडायनॅमिक अलॉय व्हील्स आणि आंतरराष्ट्रीय डिझाइन भाषेला साजेसा फ्रंट लूक यामुळे तिचा रस्त्यावर वेगळा प्रभाव पडतो. या एसयूव्हीची लांबी ४,२८५ मिमी, रुंदी सुमारे १,८०० मिमी, उंची १,६४० मिमी आणि व्हीलबेस २,७०० मिमी आहे.
रंगांच्या पर्यायांमध्ये कॅफे व्हाईट, ब्ल्यूइश ब्लॅक, गेमिंग ग्रे, स्पोर्टिन रेड आणि एंटायसिंग सिल्व्हर यांचा समावेश आहे. काही रंगांमध्ये ब्लॅक रूफसह ड्युअल-टोन पर्यायही उपलब्ध आहेत. केबिनमध्ये ड्युअल-टोन ब्लॅक-ब्राउन इंटीरियर देण्यात आले असून १०.१ इंचांची इन्फोटेनमेंट स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, जेबीएल ध्वनीप्रणाली, अॅम्बियंट लाईटिंग आणि एअर प्युरिफायर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.
सुरक्षेच्या दृष्टीने ही कार अधिक सक्षम आहे. यात सात एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि लेव्हल २ एडीएएस तंत्रज्ञान देण्यात आले आहे. ६१ किलोवॉट-तास क्षमतेच्या बॅटरी पॅकसह टॉप व्हेरियंट १७१ बीएचपी आणि १९३ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतो, तसेच ५४३ किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule