नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर - छगन भुजबळ
येवला, 03 मे (हिं.स.)। शहराचा विकास रस्ते, इमारती किंवा उद्योग यापुरता मर्यादित नसतो, तर नागरिकांच्या जीवनमानात आनंद, आरोग्य आणि समाधान वाढवणाऱ्या सुविधा देखील निर्माण होणे आवश्यक असते. नमो उद्यान ही त्याच विचाराची फलश्रुती आहे. राज्य सरकारने या प
Adding more to the glory


येवला, 03 मे (हिं.स.)।

शहराचा विकास रस्ते, इमारती किंवा उद्योग यापुरता मर्यादित नसतो, तर नागरिकांच्या जीवनमानात आनंद, आरोग्य आणि समाधान वाढवणाऱ्या सुविधा देखील निर्माण होणे आवश्यक असते. नमो उद्यान ही त्याच विचाराची फलश्रुती आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून अत्याधुनिक सोईसुविधा असलेले उद्यान येवला शहरात निर्माण होणार असून नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर पडेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पटेल कॉलनीत नमो उद्यानाचे भूमिपूजन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार समीर भुजबळ, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहराच्या विकासाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. “नमो उद्यान” हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख प्रकल्प आहे. हे उद्यान केवळ एक बाग नाही, तर येवल्याच्या प्रगतीचे, सौंदर्याचे आणि आधुनिकतेचे प्रतीक ठरणार आहे. येवला म्हणजे परंपरा आणि संस्कृतीची भूमी. पैठणीसाठी जगप्रसिद्ध असलेले आपले शहर, शिवसृष्टी आणि मुक्तीभूमीसारख्या प्रेरणादायी प्रकल्पांमुळे आधीच ओळख निर्माण करत आहे. आता “नमो उद्यान” या नव्या उपक्रमामुळे येवला शहराच्या विकासात आणखी एक सुवर्णपान जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येवला शहरात उभारले जाणारे हे उद्यान येवला शहराला एक नवी ओळख देईल, या उद्यानात प्रत्येक वयोगटासाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक किड्स प्ले एरिया, ओपन एअर थिएटर, ओपन स्पेस अँड योगा व मिडिटेशन झोन, वयोवृद्ध व इतरांसाठी बैठक व्यवस्था, रीडिंग झोन, ओपन जिम, पाथवे, टॉयलेट ब्लॉक, वृक्षारोपण, सोलर पथदिवे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे. हे उद्यान म्हणजे फक्त विकास नव्हे, तर आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक सुंदर, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. हे उद्यान येवला शहरातील प्रत्येक नागरिकाला विरंगुळा,आनंद आणि समाधान देणारे ठिकाण ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

येवला शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येऊन नगरपालिकेने याबाबत विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर उद्यान परिसरात देखील वृक्ष लागवड करावी नागरिकांनी आपला लोकसहभाग नोंदवून यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande