चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा लातूर पोलिसांकडून पर्दाफाश
लातूर, 03 मे (हिं.स.)। : जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. क
पोलीस कारवाई


लातूर, 03 मे (हिं.स.)।

: जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुमीत दगडू गरगेवाड (रा. मळवटी रोड, लातूर) व आकाश ऊर्फ भावड्या कांबळे (रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) यांचा समावेश आहे.

झडतीदरम्यान आरोपींकडून सुमारे 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली देत ही मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले.

पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक तसेच चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर) व आंबेजोगाई (बीड) येथील गुन्ह्यांसह एकूण 6 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

या कारवाईमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 187/2026 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने केली. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande