लातूर - उदयगिरीत तिरळेपणा जागरूकता अभियानासह मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात
लातूर, 03 मे (हिं.स.)। उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर व नेत्र सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०० व्या तिरळेपणा दुरुस्ती शस्त्रक्रिया शिबिरानिमित्त मोफत तिरळेपणा तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर तसेच “तिरळेपणा जागरू
नेत्र शिबिर


लातूर, 03 मे (हिं.स.)।

उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर व नेत्र सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०० व्या तिरळेपणा दुरुस्ती शस्त्रक्रिया शिबिरानिमित्त मोफत तिरळेपणा तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर तसेच “तिरळेपणा जागरूकता अभियान – चर्चा सत्र व व्याख्यान” हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली, तिरळे ५४ डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन सौ. स्वातीताई हुडे, नगराध्यक्षा, उदगीर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सौ. शिंदे ताई, उपनगराध्यक्षा, उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया, नेत्र सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुसूदन झवर, डॉ. राजेश पवार, डॉ. सचिन गाडे, सहसचिव प्रा. महेश बसपुरे सर्व विश्वस्त मंडळी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिरळेपणा, मंददृष्टी (Amblyopia), तिरळेपणाबाबत समाजातील समज-गैरसमज आणि आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे उपलब्ध उपचार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तिरळेपणा हा केवळ सौंदर्याचा विषय नसून, योग्य वेळी निदान व उपचार केल्यास दृष्टी सुधारणा शक्य आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.

विशेषतः लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या तिरळेपणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले. या जागरूकता अभियानामुळे नागरिकांमध्ये तिरळेपणाविषयी जनजागृती होऊन उपचाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

यावेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, मातृभूमी नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय हे नेत्रसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande