
ठाणे, 03 मे (हिं.स.)। ठाणे येथील सेंट्रल मैदानावर स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या वतीने आयोजित ३९ व्या डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने इंदप ॲकॅडमी क्रिकेट संघाचा ७ गडी राखून दणदणीत पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत हॅट्रिक नोंदवली.
नाणेफेक जिंकून एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंदप ॲकॅडमी संघाने २० षटकांत ५ गडी गमावत १४६ धावा केल्या. या डावात विकी पाटील याने ५९ चेंडूत ७५ धावा करत महत्वपूर्ण खेळी साकारली, तर ओमकार रहाटे याने ३९ चेंडूत ४१ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबकडून सिध्दांत सिंग (४-०-१८-३), हेमंत बुचडे (४-०-१५-१) आणि अमित पांडे (४-०-२६-१) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावसंख्येवर रोखले.
१४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या १६ षटकांत ३ गडी गमावत सामना जिंकला. आशय सरदेसाई याने ४६ चेंडूत ६२ धावा केल्या, तर चिन्मय सुतार याने सर्वाधिक ४१ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
नगरसेवक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ॲपेक्स कौन्सिल मेंबर विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग ११ वेळा प्रवेश केला असून, त्यापैकी ९ वेळा अजिंक्यपद पटकावले आहे. या यशामुळे ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट विश्वात संघाची विजयी परंपरा अधिक दृढ झाली आहे.
या शानदार यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांनी संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर