
पुणे, 03 मे (हिं.स.) - महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर हे पद काही काळ रिक्त होते. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात मोहोळ यांच्या निवडीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि अजित पवार यांची अध्यक्षपदी तर मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर मोहोळ यांनी या संघटनेची धुरा आपल्या हाती घेतली आहे.
अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते. त्यांनी नुकतेच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून संघटनेत प्रवेश केल्याने त्यांच्या निवडीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. पण, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मोहोळ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे