
वॉशिंग्टन, 03 मे (हिं.स.)।रशिया-युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने जर्मनीत तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की अमेरिका केवळ ५ हजार सैनिकांची माघार घेण्यापुरते मर्यादित राहणार नाही, तर त्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येने सैनिकांना जर्मनीतून परत बोलावले जाईल. त्यांच्या या विधानामुळे नाटो आणि युरोपच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
पेंटागॉनने जाहीर केले आहे की सुमारे ५ हजार अमेरिकन सैनिकांना जर्मनीतून अमेरिकेत परत बोलावले जाईल. मात्र, फ्लोरिडामध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही सांगितले की, “आम्ही जर्मनीतील अमेरिकन सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करणार आहोत आणि हा आकडा ५ हजारांपेक्षा खूप जास्त असेल.” तथापि, या निर्णयामागील ठोस कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की हा निर्णय अनपेक्षित नाही. त्यांच्या मते, युरोपीय देशांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक प्रमाणात उचलली पाहिजे. मात्र, त्यांनी यावरही भर दिला की युरोपमध्ये अमेरिकन सैनिकांची उपस्थिती दोन्ही पक्षांच्या हिताची आहे.
माहितीनुसार, सध्या जर्मनीमध्ये सुमारे ३६ हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत आणि ५ हजार सैनिकांची माघार म्हणजे एकूण संख्येच्या जवळपास सातव्या भागाइतकी आहे. ही प्रक्रिया पुढील ६ ते १२ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युरोपमधील आपली लष्करी उपस्थिती वाढवली होती. अशा परिस्थितीत आता सैनिकांची संख्या कमी केल्याने प्रादेशिक सुरक्षा संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode