गुजरात टायटन्स तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत, गिलचे झंझावती शतक
न्यू चंदीगड, 30 मे (हिं.स.) : २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सने आता पाच वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०२२ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपद पटकावले होते आणि आता शुभमन गिलच्या नेतृत्वा
शुभमन गिल


न्यू चंदीगड, 30 मे (हिं.स.) : २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सने आता पाच वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०२२ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपद पटकावले होते आणि आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ तोच इतिहास पुन्हा रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी ९६ धावांची शानदार खेळी करत संघाला २१४ धावांचा डोंगर उभा करण्यास मदत केली. प्रत्युत्तरात, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने (१०४) शतक झळकावून अंतिम फेरीत सहज स्थान मिळवले. यासह, २००८ मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकलेल्या राजस्थान रॉयल्सचे १८ वर्षांनंतरही दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१) पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल (७) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. ९ धावांत दोन गडी गमावल्यानंतर, राजस्थानने रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवून एक धाडसी निर्णय घेतला. जडेजाने एक बाजू सांभाळली, तर वैभव सूर्यवंशीने आपला लय पकडला. यामुळे राजस्थानला सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये २ गडी गमावून ७० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डावाच्या आठव्या षटकात जडेजाच्या कोपराला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला दुखापतग्रस्त होऊन निवृत्त व्हावे लागले. वैभवने राजस्थानसाठी एक बाजू सांभाळली आणि जबाबदारीने फलंदाजी करत ३१ चेंडूंमध्ये आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक पूर्ण केले.

दुसऱ्या बाजूला, रियान पराग (११), दासुन शनाका (३) आणि जोफ्रा आर्चर (७) एकापाठोपाठ एक बाद झाले, त्यानंतर संघाला सावरण्यासाठी जडेजा मैदानात परतला. जडेजा आणि वैभवने वेगाने धावा करणे सुरू ठेवले, परंतु हा १५ वर्षीय स्टार खेळाडू पुन्हा एकदा शतकापासून दूर राहिला. मागील सामन्यात ९७ धावा करणारा वैभव ९६ धावांवर झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत ४७ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ७ षटकार मारले.

रवींद्र जडेजा शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३५ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. शेवटच्या षटकात डोनोव्हन फरेराने राशिद खानच्या गोलंदाजीवर चार षटकार मारले. फरेराने २ चौकार आणि ४ षटकारांसह ११ चेंडूंमध्ये ३८ धावांची स्फोटक नाबाद खेळी केली. यामुळे राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावांची भक्कम धावसंख्या उभारण्यास मदत झाली.

गुजरातसाठी सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला. दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. मात्र, याच काळात साई सुदर्शनची बॅट पुन्हा एकदा निसटली आणि तो हिट विकेट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. साईने ३२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. शुभमन गिलने डाव सांभाळत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ चेंडूंमध्ये १०४ धावांचे शानदार शतक झळकावले. गिल आणि साईच्या खेळीने गुजरातच्या विजयाचा भक्कम पाया रचला आणि संघाने १८.४ षटकांत सात गडी राखून सहज लक्ष्य गाठत सामना जिंकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande