हिमाचल प्रदेशात छत्तीसगडच्या पर्यटकांची गाडी दरीत कोसळली;आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
शिमला, 31 मे (हिं.स.)। हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमधील सात पर्यटकांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चुराह उपविभागातील बैरागढ-साच पास-किलाड मार्गावर 29 मे रोजी मध्यरात्री ही दुर्घटना
accident


शिमला, 31 मे (हिं.स.)। हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमधील सात पर्यटकांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चुराह उपविभागातील बैरागढ-साच पास-किलाड मार्गावर 29 मे रोजी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. पर्यटकांना घेऊन जाणारी एर्टिगा कार खोल दरीत कोसळली. अपघातानंतरपासून सर्वजण बेपत्ता असून, त्यांच्या बचावाची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मानले जात आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान वाहनातील कुणीही वाचण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनुसार, छत्तीसगडमधील दोन कुटुंबांतील सात सदस्य पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात आले होते ते चंबा जिल्ह्यातील डलहौजी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि 29 मे रोजी साच पासच्या दिशेने सहलीसाठी गेले होते. पर्यटकांना पुन्हा त्याच हॉटेलमध्ये परतायचे होते, जिथे त्यांची बुकिंग होती. मात्र, उशिरापर्यंत ते परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्कही न झाल्याने हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

शोध मोहिमेदरम्यान समोर आले की, पर्यटकांना घेऊन जाणारी एर्टिगा कार (एचपी 01 सी 2133) बैरागढ-साच पास-किलाड मार्गावर खोल दरीत कोसळली होती. वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले असून त्याचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. दुर्घटनास्थळ अतिशय दुर्गम भागात असल्याने पोलिसांना आणि बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत आहे.

कारमध्ये छत्तीसगडचे अरविंद, त्यांची पत्नी प्राची, त्यांचे दोन मुलगे दर्श आणि अपशद, पी. जी. कार्तिगहेयन, त्यांची पत्नी मणिमाला, त्यांचा मुलगा नंदन आणि वाहनचालक विश्वास हे प्रवास करत होते. विश्वास हा चंबा जिल्ह्यातील डलहौजी परिसरातील रहिवासी आहे.

चंबाचे पोलीस अधीक्षक विजय सकलानी यांनी रविवारी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळ अत्यंत दुर्गम असल्याने तिथे पोहोचायला बराच वेळ लागत आहे. सकलानी यांनी सांगितले की, ते स्वतःही घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, वाहन खोल दरीत कोसळले असून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पोलीस आणि बचाव पथक मदत व शोध मोहिमेत गुंतले आहेत.

दरम्यान, चंबा जिल्ह्यात याच महिन्यात पर्यटकांशी संबंधित हा दुसरा मोठा रस्ते अपघात आहे. यापूर्वी 10 मे रोजी रात्री भटियात उपविभागात रविवारी उशिरा झालेल्या भीषण अपघातात गुजरातमधील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. ककीरा-लाहडू मार्गावर पावसात एक इनोव्हा गाडी अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली होती. हे पर्यटक मनालीहून डलहौजीकडे जात होते. वाहन अनेक फूट खाली दरीत कोसळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande