
नवी दिल्ली , 31 मे (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांतील भारत आणि ऑस्ट्रियाच्या स्थायी मिशनतर्फे आयोजित कार्यक्रमात शांततेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शांतिरक्षकांना अभिवादन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी सांगितले की, हे शांतिरक्षक जगभरातील संघर्षग्रस्त आणि संकटग्रस्त भागांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या कार्यात भारताचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “शांतिरक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे अत्यंत धोकादायक परिस्थितीतही जगभरात शांतता आणि स्थैर्य टिकून राहते. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांप्रती भारताची बांधिलकी अढळ असून, या उदात्त उद्दिष्टासाठी भारत आपले प्रयत्न पुढेही सुरू ठेवेल.”
या कार्यक्रमात शांततेसाठी प्राणार्पण करणाऱ्या 4,000 हून अधिक शूर पुरुष आणि महिलांना, तसेच शांतिरक्षक दलातील जवान आणि नागरी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारताने 1948 पासून आतापर्यंत 50 हून अधिक संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांमध्ये सुमारे तीन लाख सैनिक तैनात केले आहेत. भारतीय मिशनने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी आतापर्यंत सुमारे 184 भारतीय शांतिरक्षकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे.आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिन दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो. 29 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पश्चिम आशियात संयुक्त राष्ट्र युद्धविराम पर्यवेक्षण संघटना (UNTSO) या पहिल्या शांतता मोहिमेची स्थापना केली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.संयुक्त राष्ट्र मुख्यालय येथे 5 जून रोजी या दिनाचे औपचारिक आयोजन करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode