गोकुळ दुध संघ अखेर प्रशासक मंडळाच्या ताब्यात; संचालक मंडळ बरखास्त
कोल्हापूर, 04 मे (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची 5 वर्षाची मुदत संपल्याने पुणे विभागीय सहकार निबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी अखेर पाच जणांचे प्रशासकमंडळ नियुक्त केले. नवनियुक्त प्रशासक मंडळ सातारा
गोकुळ दुध संघ


कोल्हापूर, 04 मे (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची 5 वर्षाची मुदत संपल्याने पुणे विभागीय सहकार निबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी अखेर पाच जणांचे प्रशासकमंडळ नियुक्त केले.

नवनियुक्त प्रशासक मंडळ सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशीचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, सागर बलकवडे (विशेष लेखापरीक्षक), चंद्रकांत परुळेकर (अध्यक्ष धर्मादाय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर) यांचा समावेश असलेले आहे. राजकुमार पाटील (विभागीय उप निबंधक दुग्ध) यांनी या प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दररोज 20 लाख लिटर दूध संकलन, करून मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि अनेक जिल्ह्यात दूध पुरवठा, दुध पावडर सह दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आणि विक्री करणारा सर्वात मोठा सहकारी महासंघ आहे. चेअरमन नविद मुश्रीफ यांचेसह 21 संचालक असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत 4 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना 1108 अवसायानातील आणि काही अपात्र सभासद संस्थाच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा वादग्रस्त बनला. एका दूध संस्थेचे संचालक आणि चंदगडचे भाजप आ. शिवाजी पाटील यांनी या मुद्द्यावर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका, शासन दरबारी केलेला पाठपुरावा यामुळे गोकुळच्या मतदार यादीचे काम रखडले. यामुळे पर्यायाने निवडणूक प्रक्रिया थांबली.

संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची कायद्यात तरतूद नसल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त करणे अपरिहार्य बनले.

त्यामुळे 5 मे पासून गोकुळचा कारभार प्रशासक मंडळाच्या ताब्यात जाणार आहे. सदर प्रशासक मंडळ नियुक्तीचे पत्र गोकुळच्या सर्व संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनाही पाठवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande