
परभणी, 04 मे (हिं.स.)।
परभणी येथील ग्रोमेट फील्ड युनिट हे उपग्रह आधारित तंत्रज्ञान व रिअल-टाईम माहितीचा प्रभावी वापर करून देशातील उत्कृष्ट केंद्रांपैकी एक म्हणून कार्य करत आहे, अशी माहिती भारतीय मौसम विभाग, नवी दिल्ली येथील ग्रोमेट डव्हायझरी सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ. शेषकुमार गोरोशी यांनी दिली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या खरीप हंगामातील पावसाचा अंदाज तसेच ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येणार्या हंगामाचे प्रभावी नियोजन करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेत व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनात ‘खरीप 2026 आकस्मिक नियोजन’ या विषयाव ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बैठकीत जिल्हा कृषी आकस्मिक योजना अद्ययावत करणे, ‘एल निनो’ व खरीप नियोजन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तसेच बियाणे, खते व पाणी साठवणूक यांचा आढावा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे नियोजन विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis