परभणी - सुशिक्षित बेरोजगारांसाठी सोनपेठ येथे 8 मे रोजी रोजगार मेळावा
परभणी, 04 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व केंद्रीय कन्या प्रशाला, सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 मे, 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता सोनपेठ येथील केंद्रीय
परभणी - सुशिक्षित बेरोजगारांसाठी सोनपेठ येथे 8 मे रोजी रोजगार मेळावा


परभणी, 04 मे (हिं.स.)।

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व केंद्रीय कन्या प्रशाला, सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 मे, 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता सोनपेठ येथील केंद्रीय कन्या प्रशाला येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास विविध नामांकित राज्यातील मोठे उद्योजक/कंपन्या व जिल्ह्यातील खाजगी आस्थापना सहभाग नोंदविणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची क्षेत्र अधिकारी, ट्रेनी ऑपरेटर, लाईफ मित्र, फिल्ड ॲसिस्टंट ट्रेनी, इत्यादी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी वेतन 10 ते 25 हजार असून, अनुभवावरून वेतनामध्ये वाढ होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींची निवड देखील करण्यात येणार असून त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमाह 6 ते 10 हजार इतके विद्यावेतन 11 महिन्यांकरिता देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर करावी. नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे. महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नाव नोंदणी करण्यासाठी दि. 8 मे रोजी सकाळी 8.30 वाजता केंद्रीय कन्या प्रशाला, सोनपेठ येथे स्वखर्चाने सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande